देशाच्या व राज्याच्या विकासचक्राला गती देणारा अर्थसंकल्प : डॉ. अशोक उईके ‘विकसीत भारत… विकसीत महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारीत शाश्वत व सर्वसमावेशक विकासाची हमी देणारा तसेच देश व राज्याच्या विकासचक्राला अधिक गती देणारा हा अर्थसंकल्प आहे. यात उद्योग, पायाभुत सुविधा, कृषी व संलग्न क्षेत्रे, सामाजिक क्षेत्र आदींचे जाळे अधिक विस्तृत करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प महायुतीच्या सरकारने मांडला आहे. विशेष म्हणजे जल, जंगल, जमीन आणि प्राचीन संस्कृतीचे रक्षण करणा-या आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या अर्थसंकल्पात भरीव वाढ करण्यात आली आहे. गत वर्षीच्या तुलनेत आदिवासी विकास विभागाच्या निधीमध्ये तब्बल 40 टक्क्यांनी वाढ करून यावर्षी 21495 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या धोरणात्मक निर्णयामुळे आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीला चालना मिळणार असल्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले. डॉ. अशोक उईके, राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ![]()
राज्याला फसवणारा अर्थसंकल्प – खासदार प्रतिभा धानोरकर सन 2025-26 चा अर्थसंकल्प हा राज्यातील सर्वच घटकांना फसविणारा आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा नाही. लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता नाही. केवळ घोषणा करुन सर्वच घटकांची दिशाभुल केलेली आहे. मोटर वाहनांवरील कर वाढवून सामान्यांची देखील हे सरकार दिशाभुल करीत आहे. शेतकरी शेतमजूर तसेच उद्योगांजकांनासाठी हा निराशाजनक अर्थसंकल्प आहे. प्रतिभा धानोरकर, खासदार ![]()
राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने जनताभीमुख : आ. सुधीर मुनगंटीवार “महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या सहकार्याने आज सादर केलेला अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने जनताभीमुख असून महाराष्ट्राच्या प्रगतीला गती देणारा आहे.” अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. मुनगंटीवार म्हणाले की, सर्वसमावेशक आणि राज्याच्या प्रगतीला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग, दळणवळण आणि पर्यावरण या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांना दिलेले प्राधान्य स्वागतार्ह आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक घटकाच्या विकासाचा विचार करून घेतलेले निर्णय निश्चितच महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिशादर्शक ठरतील. या सकारात्मक आणि दूरदृष्टी असलेल्या अर्थ संकल्पाचे मी स्वागत करतो व अर्थमंत्र्यांचे अभिनंदन करतो. सुधीर मुनगंटीवार, आमदार, बल्लारपुर विधानसभा ![]()
महायुतीचा अर्थसंकल्प म्हणजे भाषणाचा सुकाळ, निधीचा दुष्काळ : विजय वडेट्टीवार हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त घोषणांचा सुकाळ,निधीचा मात्र दुष्काळ आणि सरकारची जुमलेबाजी या अर्थसंकल्पातून दिसली,. ज्यांच्या मतांवर महायुती सरकार सत्तेत आले त्याच लाडक्या बहिणी, शेतकरी, वंचित, आदिवासी यांचा महायुतीने विश्वासघात केला. निवडणुकी आधी गुलाबी जॅकेट घालून फिरणारे आता गुलाबी जॅकेट ही विसरले आणि लाडक्या बहिणींना विसरले. शेतकऱ्यांशी देखील सरकारने गद्दारी केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असे आश्वासन महायुती सरकारने निवडणुकीत दिले होते पण आज अर्थसंकल्पाच्या भाषणात बळीराजाच्या पदरी निराशा आली आहे, त्यामुळे महायुती सरकार क्या हुआ तेरा वादा? बँका आता शेतकऱ्यांना कर्ज देणार नाही याला कोण जबाबदार असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. विजय वडेट्टीवार, काँग्रेस विधी मंडळ नेते ![]()


