उत्पादन शुल्क विभागाची कृती शून्य
शिवसेनेच्या वतीने कारवाईची मागणी
अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
वरोरा : वरोरा व भद्रावती तालुक्यात शासनमान्य देशी-विदेशी दारू दुकानांतून मोठ्या प्रमाणावर अवैध दारूचा पुरवठा होत आहे. ही दारू दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पुरवली जात असून, वाईन शॉपमधून बारमध्येही थेट दारूचा पुरवठा केला जात असल्याचे उघड झाले आहे. उत्पादन शुल्क विभाग आणि प्रशासन या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड यांनी निवेदनाद्वारे या शासनमान्य दारू दुकानावर कारवाही करण्याची मागणी केली आहे.
. शासनमान्य दुकानांमधून अवैध पद्धतीने दारूचा साठा बाहेर काढून तो विविध भागांत मोठ्या प्रमाणावर पुरवला जात आहे. यात स्थानिक पातळीवरील काही राजकीय कार्यकर्ते आणि दलालांचे सक्रिय नेटवर्क असल्याची चर्चा असून, अनेक ठिकाणी बनावट दारू विक्रीसाठीही खुली बाजारपेठ निर्माण झाली आहे.
. दिनांक ११ फेब्रुवारी रोजी वर्धा जिल्ह्यात दारू पुरवठा होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाने एका चारचाकी वाहनातून अवैध दारूचा साठा जप्त केला. मात्र, या प्रकरणात फक्त गाडी ताब्यात घेण्यात आली आणि मुख्य सूत्रधारांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. प्रशासनाकडून केवळ थातूरमातूर कारवाई करून हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न झाला असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे. वरोरा आणि भद्रावती भागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या गोरखधंद्यामागे स्थानिक राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते आणि काही अधिकारी मिळून आहेत, अशी चर्चा आहे. दारू दुकानांकडून प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाला लाखोंचा हप्ता दिला जात असल्यानेच कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे.
. यात अधिक धक्कादायक बाब म्हणजे, या अवैध विक्रीत नकली दारूचा समावेश झाला असून त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नकली दारूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष असून, संबंधित अधिकारी मुग गिळून गप्प बसल्याचे चित्र आहे. वाढत्या अवैध दारू विक्रीच्या विरोधात शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड यांनी उत्पादन शुल्क विभागाला निवेदन दिले आहे. या निवेदनात तातडीने अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
. जर लवकरात लवकर या प्रकरणात ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.यापुढेही अवैध दारूविक्रीचा हा गोरखधंदा असाच सुरू राहणार ही यातील राजकीय वरदहस्त असलेला मुख्य मोरक्यावर कारवाही होणार की उत्पादन शुल्क विभाग व अवैध दारूविक्रते यांच्यातील मधुर संबंध टिकून राहणार हे बघणे औचित्याचे आहे.


