विसापूर येथे गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ सामाजिक बांधवांचा सत्कार
बल्लारपूर : संत रविदासांनी समाज परिवर्तनाची कास धरली होती. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी कार्य केले. आपल्या काव्यात्मक शैलीने समाज प्रबोधन केले. त्यांचा ‘ मन चंगा तो कटोती में गंगा ,’ हा दोहा समाजाला दिशा देणारा आहे. याच मार्गाने समाज बांधवांनी वाटचाल करावी. संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या विचारांवर समाज बांधवांनी नवसमाज निर्मितीचा ध्यास घ्यावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे यांनी विसापूर येथे केले.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा आणि संत रविदास महिला समितीच्या वतीने सामाजिक क्रांतीचे प्रणेते संत शिरोमणी रविदास महाराज यांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. यावेळी प्रबोधन कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. तत्पूर्वी संबा वाघमारे यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उदघाटन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शाखा अध्यक्ष पंढरी गुजरकर होते.
. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजुरा येथील माजी आमदार ॲड. वामनराव चटप,विदर्भ राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष संबा वाघमारे, राज्याचे उपाध्यक्ष समिक्षा भटवलकर, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विप्लव लांडगे, दिवाकर पेलने,मोतीराम वादेकर,कुदंन धुळे, पुष्पकुमार मेंढे,संत रविदास महिला समितीच्या अध्यक्ष आरती लिपटे आदींची उपस्थिती होती.
दरम्यान मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा व समाजातील जेष्ठ समाज बांधवांचा शाल ,श्रीफळ, स्मृतीचिन्ह प्रदान करून भावपूर्ण सत्कार करण्यात आला. नव्या सुनिल वाढई या बालिकेने संत रविदास महाराज यांच्या जीवनातील प्रसंगाचे वर्णन मंत्रमुग्ध करणारे ठरले.प्रास्ताविक भाषणातून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा संपर्क प्रमुख सुभाष भटवलकर यांनी येथील समाज बांधवांची वाटचाल व समाजाभिमुख कार्याचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी गुजरकर व अविनाश शिवणकर यांनी केले. आभार उद्धव खंडाळे यांनी मानले. यावेळी समाज बांधवांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
समाजात चार ‘ सि ‘ गुणधर्म महत्वाचे घटक – ॲड. वामनराव चटप आजघडीला शिक्षणात गुणवत्तेला अन्यय साधारण महत्त्व आले आहे. आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा व समाजातील जेष्ठांचा सत्कार समारंभ घडवून आणला आहे. हा योगायोग कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांने संगणक, आत्मविश्वास, स्पर्धा व चारित्र्य या इंग्लिश मधील चार ‘ सि ‘ अक्षरांवर भर द्यावा. हिच यशस्वितेसाठी खात्री आहे. यातील पाचवी ‘ सि ‘ भ्रष्टाचार याचा जीवनातून हद्दपार करून सत्याचा स्वीकार करावा. हीच संतांची खरी शिकवण आहे.यासाठी समाजात चार ‘सि’ हे मानवी जीवनात प्रगतीची महत्वाचे घटक आहे, असे ॲड. वामनराव चटप यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.


