भद्रावती : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गुडगाव (वडे) येथे दि.१५ फेब्रुवारी ला सीखे प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी गणित व भाषेवरील अद्भुत मॉडेल्स सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.
. या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी गणित विषयातील अपूर्णांकावर आधारित मॉडेल तसेच भाषेतील गोष्टीचे पुस्तकातील चित्रावरून गोष्ट सांगण्याचे मॉडेल सादर केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांच्या कल्पकतेचे दर्शन घडले. विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे व त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे पालक व उपस्थित पाहुण्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून आम्हाला खूप काही शिकण्यासारखे मिळाले असे पालकांनी यावेळी मत व्यक्त केले.
. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नागेश सोनटक्के, समिती सदस्य प्रियांका ढवस, राजेंद्र वैद्य तसेच निर्मला देवतळे (अंगणवाडी सेविका) यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. पाचगाव (मु.) येथून आलेले किशोर गुंडावार शिक्षक यांनी या कार्यक्रमात आपला अमूल्य सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. त्यांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यात अधिक आत्मविश्वास प्राप्त झाला. या प्रदर्शनीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या संकल्पनांना प्रोत्साहन मिळाले असून, शाळेतील विविध उपक्रमांच्या माध्यमातून ज्ञानाचे नव्या दृष्टीकोन विकसित होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. सीखे प्रदर्शनीचे आयोजन कुमारी अश्विनी सुनील वरपल्लीवार, मुख्याध्यापक राजीव खुटेमाटे यांच्या नेतृत्वाखाली आणि शिक्षिका योगिता चिमूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.


