ई-केवायसी पासून होणार सुटका
सिंदेवाही : शासनाच्या कृषीसंलग्न असलेल्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीने व अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ऍग्रीस्टॅक योजने अंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक दिला जात आहे. तरी सिंदेवाही तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तात्काळ जवळच्या नागरी सुविधा केंद्रावर (सि एससी सेंटर) नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करण्याचे आवाहन सिंदेवाही तहसीलदार संदीप पानंमद यांनी केले आहे.
. प्रत्येक शेतकऱ्यांचे सहज आणि सुलभपणे शेतकरी ओळख क्रमांक नोंदणी व्हावे. यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तहसील कार्यालय सिंदेवाही येथे सुद्धा ऍग्रीस्टॅक योजनेंतर्गत नोंदणीसाठी शेतकऱ्याकरिता स्वतंत्र मदत कक्ष निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे सिंदेवाही तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला शेतकरी ओळख क्रमांक ( फार्मर्स आयडी ) प्राप्त करून घेण्यासाठी तात्काळ नोंदणी करावी. असे आवाहन करण्यात आले.
फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) का आवश्यक आहे ? ऍग्रीस्टॅक योजनेत नोंदणी केल्याने आपल्या शेतीची डिजिटल ओळख बनवतो, हवामान सूचना पाठवतो, पीक विमा, पीक कर्ज, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, यारख्या सर्व सरकारी योजनांचे अनुदान सहज आणि सुलभ करतो, आपले उत्पन्न वाढविण्यासाठी मदत करतो, आपल्या पिकांची नोंद ठेवतो. शेतकऱ्यांना या आयडीच्या मदतीने शेतकऱ्यांना वारंवार प्रमाणिकरण (ईकेवायसी ) करण्याची गरज राहणार नाही. मंगेश तुमराम, नायब तहसीलदार, सिंदेवाही.


