शिक्षकांच्या संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात
परिक्षे दरम्यान गोंधळ होण्याची भिती
बल्लारपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने आगामी दहावी व बारावीच्या परीक्षा कापीमुक्त करण्याचा नवा ‘पॅटर्न’ जाहीर केला आहे. दुसऱ्या शाळेतील केंद्र संचालकांचा व पर्यवेक्षक म्हणून रूजू करण्याचा फतवा काढला आहे. परीक्षेदरम्यान यामुळे गोंधळाची सिस्थी निर्माण होण्याची शक्यता आहे.याविरुद्ध शिक्षकांच्या संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे दिसून येत आहे. आता तर कापीमुक्त नव्या ‘पॅटर्न’ बाहेरून येणाऱ्या केंद्र संचालकांचा व पर्यवेक्षकांचा विरोध करणे सुरू झाले आहे.
. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान पार पडणार आहे. या सत्रातील दोनही परीक्षा कापीमुक्त नव्या ‘पॅटर्न’ अनुसरून घेण्याचा मनोदय शिक्षण मंडळाने केला आहे. यासाठी परीक्षा केंद्रावर दुसऱ्या शाळा व महाविद्यालय येथील केंद्र संचालकांची व पर्यवेक्षकांची परीक्षा दरम्यान नेमणूक करण्याचे योजले आहे. परिणामी परीक्षा केंद्रावर बाहेरून येणाऱ्या केंद्र प्रमुख व पर्यवेक्षक यांना अडचण येण्याची शक्यता आहे. परीक्षेदरम्यान केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण करणारी ही बाब आहे. यावर शिक्षकांच्या संघटनांनी आक्षेप घेतला आहे.
. बारावीच्या व दहावीच्या परीक्षा केंद्र शहरी व ग्रामीण भागात येत आहे. परीक्षा केंद्रावर येणाऱ्या केंद्र प्रमुख व पर्यवेक्षक यांना परीक्षेदरम्यान केंद्रावर ५ ते ७ किमी अंतरावरून ये – जा करावे लागणार आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कापीमुक्त नव्या ‘ पॅटर्न ‘आणण्यात आले. मात्र यापूर्वी देखील हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यासाठी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले. ते प्रयत्न देखील कमी पडले. अद्याप काही शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले नाही. आता नव्याने कापीमुक्त ‘पॅटर्न’ आणून परीक्षा केंद्रावर बाहेरून केंद्र संचालकांचा नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पर्यवेक्षक म्हणून देण्यात येणार आहे.
. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्र संचालक व पर्यवेक्षक बदलण्याचा प्रकार त्या शाळेतील शिक्षकावर अविश्वास दाखविणारा आहे. शिक्षकांची प्रतिमा डागाळणाऱ्या प्रकाराचा शिक्षक संघटनेचा आरोप आहे. याचा विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
” बारावी व दहावीच्या परीक्षेसाठी बाहेरून शाळेतील केंद्र संचालक व पर्यवेक्षक नेमणूक करण्यास विरोध आहे. अदलाबदल करण्याचा प्रकार अमान्य आहे. केवळ केंद्र प्रमुख व उपकेंद्र प्रमुख यांची नेमणूक दुसऱ्या शाळेतील करावी. अन्य शिक्षकांना त्याच शाळेतील परीक्षा केंद्रावर ठेवावे. ही आमची आग्रही मागणी आहे. दिलीप मकलवार, जिल्हा कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, चंद्रपूर. “


