एनजीओ ची चौकशी करून दोषींवर कारवाही करण्याची मागणी
सिंदेवाही : जल जीवन मिशन अंतर्गत जल साक्षरता अभियान अधिक गतिमान करण्यासाठी सिंदेवाही पंचायत समिती सभागृहात राबविण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये चक्क ग्राम पंचायत पदाधिकारी व ग्राम स्तरीय समिती सदस्यांना डावलण्यात आले असल्याने सबंधित एनजीओ ची चौकशी करून दोषींवर कारवाही करण्यात यावी. अशी मागणी प्रसार माध्यमातून करण्यात येत आहे.
. पंचायत समिती सिंदेवाही सभागृहात जलजिवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत व गावस्तरीय समिती, जल साक्षरता अभियान दिनांक २ जानेवारी ते ७ जानेवारी २०२५ पर्यंत राबविण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग जलजिवन मिशन अंतर्गत, ग्रामपंचायत व गावस्तरीय समिती सदस्याचे, जल साक्षरता अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानामध्ये ग्रामपंचायत सरपंच, सदस्य गावातील आशा वर्कर, तसेच गावातील ईतर समित्यांचे पदाधिकारी उपस्थित राहून, पाणीपुरवठा व स्वच्छता या बाबतीत माहिती आत्मसात करून, गावातील जनतेला याचा प्रचार व प्रसार करणे आवश्यक आहे. सदर अभियान राबविण्याचे काम एका सामजिक संस्थेमार्फत घेण्यात आले. परंतु या अभियानात पहिल्या दिवशीच ग्रामपंचायत पदाधिकारी यांची अनुपस्थिती होती. तसेच आशा वर्कर यांना सुद्धा सूचना देण्यात आल्या नसल्याने या अभियानाला ग्रामपंचायत पदाधिकारीच अडसर ठरत आहेत का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
. सदर प्रशिक्षणाला पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या संपूर्ण ग्रामपंचायत स्तरावरून केवळ १५ ते २० व्यक्ती उपस्थित राहत होते. तसेच या अभियानात सहभागी नसलेल्या व्यक्तीचे आधार कार्ड नंबर घेऊन, त्यांच्या खोट्या आणि बनावट स्वाक्षऱ्या केले असल्याची माहिती प्राप्त झाली असून याबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करून सदर संस्थेला काळ्या यादीत घोषित करण्यात यावे. अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या जल जीवन मिशन अंतर्गत प्रशिक्षण देणाऱ्या व्यतीरिक्त दुसरे कोणतेही अधिकारी – कर्मचारी उपस्थित नव्हते. यावरून जल जीवन मिशन अंतर्गत जल साक्षरता अभियान प्रशिक्षण राबविण्याचा पूर्णतः फज्जा उडाला आहे. तसेच याबाबतचा सरकारवर अतिरिक्त खर्चाचा भार पडत आहे की काय असे दिसून येते. त्यामुळे संबधित सामाजिक संस्थेची चौकशी करून संबधित विभागाने दोन्हीवर कारवाही करावी. अशी मागणी प्रसार माध्यमातून करण्यात येत आहे.


