एकार्जुना येथे झाडाचा आश्रय घेणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू
वरोरा : तालुक्यातील एकार्जुना गावात सोमवारी सायंकाळी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास निसर्गाचा थरार पाहायला मिळाला. अचानक आलेल्या वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटात अंगावर वीज पडल्याने एका ४० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. नितीन चंद्रशेखर डुडुरे (वय ४०, रा. एकार्जुना) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.
. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन डुडुरे हे दुपारी आपल्या शेतातील कामे आटोपण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले होते. मात्र, सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट प्रचंड असल्याने पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नितीन यांनी शेतातील एका झाडाचा आसरा घेतला. दुर्दैवाने, त्याच वेळी त्या झाडावर अत्यंत तीव्रतेची वीज कोसळली. हा आघात इतका भीषण होता की नितीन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांचा ट्रॅक्टर झाडापासून काही अंतरावर दुसऱ्या बाजूला उभा होता.
. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच संबंधित अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवण्यात आला आहे. पावसाळ्यात झाडाखाली आश्रय घेणे किती धोकादायक ठरू शकते, हेच या दुर्दैवी घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.


