Home सामाजिक वृक्षसंवर्धनातून साकारूया हरित चंद्रपूर

वृक्षसंवर्धनातून साकारूया हरित चंद्रपूर

11

जिल्ह्याला हरित विकासाचे मॉडेल बनवूया ! — आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपुरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महावृक्षारोपण उपक्रम उत्साहात

सर्व धर्मांतील धर्मगुरूंच्या उपस्थितीत पर्यावरण रक्षणासाठी लोकसहभागाचे आवाहन

चंद्रपूर : वाढत्या हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी वृक्षसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने केवळ वृक्षारोपण न करता, लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्याला हरित विकासाचे आदर्श मॉडेल बनविण्यासाठी लोकसहभाग अत्यावश्यक असून, पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची नव्हे तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

.      जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती त्रिशताब्दी नागरी समिती व ट्रॅक्टर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सोनचाफा हनुमान मंदिर, पठाणपुरा गेट येथे ‘महावृक्षारोपण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

मानवी जीवनातील वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व

माजी वनमंत्री म्हणून कार्य करताना वनसंपदा, जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व जवळून अनुभवल्याचे सांगत आमदार मुनगंटीवार म्हणाले की, मानवाच्या जीवनातील पहिल्या श्वासापासून अंतिम प्रवासापर्यंत वृक्षांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. झाडे केवळ प्राणवायू पुरवत नाहीत, तर संपूर्ण सृष्टीचा जीवनाधार आहेत. पृथ्वीवरील जीवनचक्र अखंड ठेवण्यात वृक्षांची भूमिका मोठी असून, प्रत्येक नागरिकाने किमान पाच वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करावा.

वृक्षांमधून मिळतो सर्वधर्मसमभाव आणि समानतेचा संदेश

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वधर्मसमभाव आणि पर्यावरण संवर्धन यांचा अनोखा संबंध अधोरेखित केला. जगातील प्रत्येक धर्मात वृक्षांचे महत्त्व विशेषत्वाने सांगितले आहे. वृक्ष कधीही जात, धर्म, पंथ किंवा आर्थिक स्थितीचा भेदभाव करत नाहीत. ते सर्वांना समान सावली, समान प्राणवायू आणि जीवनाचा आधार देतात. समानता, मानवता आणि पर्यावरण संरक्षणाचा सर्वात प्रभावी संदेश वृक्षांकडूनच मिळतो. वृक्षांच्या या वैश्विक आणि सर्वसमावेशक स्वरूपातून समाजाने एकतेचा धडा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

आयोजकांचे कौतुक आणि जनआंदोलनाचे आवाहन

चंद्रपूर हा वनसंपदेने समृद्ध जिल्हा असून, त्याचे हरित वैभव जपणे आणि वाढविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या ट्रॅक्टर असोसिएशन तसेच डॉ. मंगेश गुलवाडे आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे आमदार मुनगंटीवार यांनी विशेष अभिनंदन केले. अशा लोकसहभागातूनच पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक बळकट होणार असून वृक्षसंवर्धनाला जनआंदोलनाचे स्वरूप देऊन चंद्रपूरला राज्यातील हरित विकासाचा आदर्श जिल्हा बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

मान्यवरांची मोठी उपस्थिती

या महावृक्षारोपण कार्यक्रमाला चंद्रपूरच्या महापौर संगीता खांडेकर, तसेच विविध धर्मांचे धर्मगुरू महाराज सुधाकर बगडे, फादर बिबिन ठेकेकारा, मौलाना फजरूल रहमान खान, भंते मंगल बुद्ध विपकी आणि ग्यानी लाहोर सिंगजी प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय डॉ. मंगेश गुलवाडे, नगरसेवक रवी लोणकर, नगरसेवक प्रज्वलंत कडू, नगरसेविका सविता सरकार, नम्रता ठेमस्कर, बंडू गौरकार, मनोज सिघंवी, अजय सरकार, चांद सय्यद, रंजीत ढवळे, रवी चहारे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!