राज्य पदाधिकाऱ्यांकडून कौतुक
ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भद्रावती येथे कार्यक्रम संपन्न
अवघ्या ५ महिन्यांत ग्राहकांना मिळवून दिला न्याय
भद्रावती : ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या राज्य कार्यकारिणीच्या विदर्भ दौऱ्यानिमित्त शनिवारी भद्रावती येथे आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य सचिव अरुण वाघमारे, राज्य संघटक सर्जेराव जाधव, राज्य कार्यकारी सदस्य चंद्रकांत डागा, विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर, विदर्भ प्रांत सचिव लिलाधर लोहरे आणि कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
. कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मार्गदर्शकांनी ग्राहक हक्क, ग्राहक जागरूकता आणि संघटनेच्या पुढील कार्याची दिशा यावर उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन केले.
. ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संघटना ग्राहकांच्या हक्कांसाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. राज्य कार्यकारिणीच्या या दौऱ्यादरम्यान भद्रावती शाखेच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या भद्रावती शाखेने अत्यंत कमी कालावधीत अनेक ग्राहकांच्या तक्रारींचे यशस्वी निवारण करून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. शाखेच्या या उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरीची विशेष दखल घेत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी भद्रावती शाखेचे जाहीर कौतुक केले.
. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावतीचे अध्यक्ष प्रवीण चिमुरकर, सचिव वतन लोणे, उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार, सहसचिव करुणा मोघे, कोषाध्यक्ष भारत खोब्रागडे, संघटक सोनल वावरे तसेच सदस्य विनोद ठमके, गुरुदेव बावणे, रवी भांडारकर, नामदेव रामटेके आणि प्रतिक्षा बनकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वतन लोणे यांनी केले, प्रास्ताविक प्रवीण चिमुरकर यांनी मांडले, तर उपस्थितांचे आभार डॉ. ज्ञानेश हटवार यांनी मानले. या यशस्वी कार्यक्रमामुळे परिसरातील ग्राहक चळवळीला आणखी मोठी ताकद मिळणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


