Home चंद्रपुर जिल्हा विशेष बोडखा मोकाशी येथे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचा दौरा

बोडखा मोकाशी येथे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचा दौरा

197

शेतकरी पुत्र इंजि. गणेश चिडे यांनी विविध मागण्यांचे दिले निवेदन !

कोसरसार नाल्याचे खोलीकरण व नवीन पुलाच्या बांधकामाची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली हळद पिकाची पाहणी

 वरोरा : तालुक्यातील बोडखा मोकाशी येथे हळद संशोधन संदर्भात चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या थेट शेतात जाऊन हळद लागवड प्रक्रिया समजून घेतली, तसेच हळदीला बाजारपेठेत उत्तम दर्जाचा भाव कसा मिळेल या संदर्भात उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आल्याने गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी मोठा आनंद व्यक्त केला.

.        याचवेळी बोडखा मोकाशी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी पुत्र इंजि. गणेश चिडे यांनी गावच्या विविध समस्यांवर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे लक्ष वेधले आणि त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात प्रामुख्याने नमूद करण्यात आले की, कोसरसार ते बोडखा मार्गावर एक अतिशय जुना पूल आहे. पावसाळ्यात या पुलावरून सुमारे पाच फूट पाणी वाहत असल्याने गावकऱ्यांचा संपर्क पूर्णपणे तुटतो. यामुळे शालेय विद्यार्थी आणि आजारी व्यक्तींचे अतोनात हाल होतात. यापूर्वी येथे जीवितहानी देखील झाली आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून कोसरसार नाल्याचे खोलीकरण करण्यात यावे आणि नवीन पुलाच्या बांधकामाला त्वरित मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी इंजि. गणेश चिडे यांनी केली. जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय टळेल.

.        याशिवाय, शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाची ‘गाव तिथे गोदाम’ ही योजना बोडखा मोकाशी गावाला मिळवून द्यावी, अशीही मागणी या निवेदनातून करण्यात आली. यावेळी इंजि. गणेश चिडे यांनी आपल्या शेतात उत्पादित केलेल्या सेंद्रिय हळदीचे ‘चिडे बंधू हळद पावडर’ या ब्रँडचे पॉकेट जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिले. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या गावात आम्ही हा लघुउद्योग चालवत असल्याची माहिती त्यांनी दिली.

.         या दौऱ्यादरम्यान जिल्ह्याचे मुख्य कृषी अधिकारी तोटावार यांच्यासह बोडखा मोकाशी गावातील समस्त शेतकरी बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!