जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज विशेष ‘हळद संशोधन दौरा’
वरोरा तालुक्याने निर्माण केला शेतीचा नवा आदर्श
शेतकऱ्यांसाठी प्रगतीची सुवर्णसंधी
चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी गावाने कृषी क्षेत्रात एक नवा आणि आदर्श पायंडा पाडला आहे. या गावात उत्पादित केले जाणारे हळदीचे बियाणे आता संपूर्ण महाराष्ट्रात ‘उत्तम दर्जाचे बियाणे’ म्हणून नावारूपास आले आहे. याच पार्श्वभूमीवर, प्रगतशील शेतीला अधिक चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वासुमना पंत (आयएएस) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज, ५ जून २०२६ रोजी विशेष ‘हळद संशोधन दौरा’ आयोजित करण्यात आला आहे.
. या दौऱ्यादरम्यान आयोजित १ तासाच्या विशेष सत्रात तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना शेती ते प्रक्रिया उद्योगापर्यंतच्या प्रवासाचे महत्त्वपूर्ण धडे दिले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने हळदीचे विक्रमी व भरघोस उत्पन्न कसे घ्यावे, उत्पादनाला बाजारपेठेत जास्तीत जास्त भाव मिळवण्यासाठी आधुनिक मार्केटिंगच्या कोणत्या टिप्स वापराव्यात आणि मूल्यवर्धन करून गावातच हळदीचे विविध पदार्थ कसे तयार करावेत, यावर सविस्तर मार्गदर्शन केले जाईल.
. बोडखा मोकाशी गावाची ही यशोगाथा आता खऱ्या अर्थाने ब्रँड बनू लागली आहे. गावातील ‘चिडे बंधू हळद पावडर’ आणि ‘प्रगती शेतकरी गट हळद पावडर’ यांच्या दर्जेदार उत्पादनांमुळे स्थानिक हळदीला बाजारपेठेत मोठी मागणी निर्माण झाली आहे. गावची ही यशस्वी ओळख आता अधिक विस्तारण्यासाठी आज सकाळी १० वाजता आयोजित या कार्यक्रमात इंजि. गणेश चिडे, प्रकाश कामडी, डॉ. राऊत आणि विठ्ठल कोसूरकर हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आधुनिक शेतीतून थेट नफा मिळवण्यासाठी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


