Home चंद्रपुर जिल्हा विशेष वरोरा तहसील कार्यालयातील सेतू केंद्राला वेळेचा विसर !

वरोरा तहसील कार्यालयातील सेतू केंद्राला वेळेचा विसर !

7

सकाळी १० ची वेळ, खिडकी उघडते ११ वाजता

ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी उन्हातान्हात बेहाल

वरोरा : राज्य शासनाने राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना उघडण्याची वेळ निश्चित करून दिली आहे. शासन निर्णयानुसार सर्व कार्यालये सकाळी १० वाजता सुरू होणे बंधनकारक आहे. मात्र, वरोरा तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रावर या वेळेच्या नियमाला साफ हरताळ फासला जात असल्याचे संतापजनक चित्र समोर आले आहे.

नागरिकांची उन्हातान्हात ससेहोलपट

या सेतू केंद्रावर उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी ग्रामीण भागातून नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थी सकाळी ९ वाजल्यापासूनच रांगेत उभे राहतात. मात्र, प्रत्यक्षात केंद्राचे कर्मचारी सकाळी १०:३० ते ११ वाजेनंतर खिडकी उघडून कामकाज सुरू करतात. त्यामुळे रखरखत्या उन्हात तासन्‌तास वाट पाहणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

.          “आम्ही शेतातले काम सोडून, बसचे भाडे खर्च करून येथे येतो. पण तासन्‌तास वाट पाहूनही ११ वाजेपर्यंत खिडकी उघडत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका त्रस्त नागरिकाने दिली.

शासकीय नियमांचे उल्लंघन

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार, सर्व शासकीय कार्यालयांची वेळ सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी ठरलेली आहे. जनतेच्या थेट संपर्कात असणारे सेतू केंद्र किमान सकाळी १० वाजता सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र, या केंद्राच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी व नोकरी इच्छुकांना वेळेत दाखले न मिळाल्याने मोठे शैक्षणिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

प्रशासनाची भूमिका

“सेतू केंद्रातील ऑपरेटर नवीन असल्याने त्यांना कामाचा पुरेसा अनुभव नाही. या केंद्राबाबतची तक्रार आमच्यापर्यंत आली असून, संबंधित कर्मचाऱ्यांना वेळेचे काटेकोर पालन करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. यानंतरही हलगर्जीपणा सुरू राहिल्यास थेट कडक कारवाई केली जाईल.”

— उल्हास लोखंडे (नायब तहसीलदार, वरोरा)

error: Content is protected !!