लग्नासाठी किंवा बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू घरात ठेवू नका
संशयास्पद हालचाली दिसल्यास ‘११२’ वर करा संपर्क
वरोरा : सध्या लग्नसमारंभ आणि इतर कारणांमुळे अनेक नागरिक घरांना कुलूप लावून बाहेरगावी जात आहेत. हीच संधी साधून घरफोडी आणि चोरीच्या घटना घडण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वरोरा पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
. पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी घराबाहेर जाताना मुख्य दरवाजाचे कुलूप अशा पद्धतीने लावावे जे बाहेरून सहज दिसणार नाही. सुरक्षेसाठी अधिक भक्कम आणि आधुनिक पद्धतीच्या कुलूपांचा वापर करावा. तसेच घरात मोठी रोकड रक्कम किंवा सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने ठेवू नयेत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
. परिसरात कोणताही संशयास्पद व्यक्ती दिवसा किंवा रात्रीच्या वेळी फिरताना दिसल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी किंवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा. नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य केल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे सोपे होईल, असे आवाहन वरोरा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


