Home चंद्रपुर जिल्हा विशेष चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेचा धमाका

चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेचा धमाका

1

३ घरफोडीचे गुन्हे उघड

१७.७८ लाखांच्या मुद्देमालासह सराईत गुन्हेगार जेरबंद

मूल आणि घुग्घुस हद्दीतील घरफोडीचा उलगडा

१०५ ग्रॅम सोने, १.४ किलो चांदी आणि महागडी यामाहा आर-वनबाईक जप्त

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते. या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत चाणाक्षपणे आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर सराईत गुन्हेगार अमोल इलमकर (रा. दुर्गापूर) याला अटक करून तीन मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १७ लाख ७८ हजार २२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाचा मेळ

पोलीस स्टेशन मूल आणि घुग्घुस हद्दीतील घरफोडीच्या घटनांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे होता. तपासादरम्यान गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमोल इलमकर या सराईत गुन्हेगाराची हालचाल संशयास्पद आढळली. पोलिसांनी नियोजनबद्धरीत्या सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि डिजिटल ट्रॅकिंग यांसारख्या तांत्रिक पुराव्यांचा आधार घेत पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

१७.७८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेद्वारे झडती घेतली. यामध्ये चोरीला गेलेले १०५ ग्रॅम सोन्याचे दागिने पंचासमक्ष जप्त करण्यात आले. तसेच, घुग्घुस येथील चोरीचा माल चांदीच्या दागिन्यांपासून तयार केलेल्या १ किलो ४११ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या लगडीच्या स्वरूपात एका महिलेकडून जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, गुन्ह्यासाठी वापरलेली महागडी ‘यामाहा आर-वन’ (Yamaha R1) मोटारसायकल आणि मोबाईल फोनही पोलिसांनी हस्तगत केला आहे.

पोलीस प्रशासनाची यशस्वी कामगिरी

सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकात बलराम झाडोकार, संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, सुनील गौरकार, रजीनकांत पुठ्ट्टावार, सचिन गुरनुले, संतोष येलपुलवार, गणेश मोहुर्ले, दिनेश अराडे, नितीन कुरेकार, नितीन साळवे, प्रमोद कोटनाके, सुरेंद्र महतो, निराशा तितरे, उषा लेडांगे, प्रफुल्ल गारघाटे, शेखर माथनकर आणि अमोल सावे यांचा समावेश होता.

.       या धडक कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील घरफोडीच्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे कौतुक करत आहे.

error: Content is protected !!