Home चंद्रपुर जिल्हा विशेष चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भीषण अपघात

चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भीषण अपघात

17

दोन तरुणांचा जागीच मृत्यू

नंदोरी गावाजवळ मालवाहू वाहन आणि दुचाकीची समोरासमोर धडक

अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा

महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे संताप

चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर महामार्गावर रविवारी सायंकाळी एका भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. नंदोरी गावाजवळील जिनिंगच्या आसपास मालवाहू वाहन आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. महामार्गावर सुरू असलेल्या संथ कामामुळे रस्ता अरुंद झाला असून, याच कारणाने हा अपघात झाल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.

लग्नाहून परतताना काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर वालदे (२९) आणि मयूर हाडके (३३, दोघेही रा. खानगाव मोझरी, ता. हिंगणघाट) हे दोघे भद्रावती येथील एक लग्न समारंभ आटोपून आपल्या दुचाकीने (क्र. MH 32 BA 7386) घराकडे परतत होते. दरम्यान, वरोराकडून चंद्रपूरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू वाहनाने (क्र. MH 34 BG 0156) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी वरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

दोन जण गंभीर जखमी

या अपघातात मालवाहू वाहनातील अक्षय थेरे (३०) आणि रघुनाथ डाखोरे (रा. अंभोरा, चंद्रपूर) हे दोघेही जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

महामार्गाचे काम ठरतेय ‘यमदूत’

चंद्रपूर-नागपूर महामार्गाचे काम सध्या ठिकठिकाणी सुरू आहे. वरोऱ्याजवळील दत्त मंदिरापासून 1 किलोमीटर पर्यंत व नंदोरी बस स्टॉप पासून 3 किलोमीटर पर्यंत रस्ता खोदून ठेवल्याने वाहतूक ‘सिंगल रोड’ने सुरू आहे. अर्धवट खोदकाम आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. १२ एप्रिल रोजी देखील याच परिसरात तिहेरी अपघात झाला होता.

वाहतुकीचा खोळंबा

अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नंदोरी येथील जगन्नाथ बाबा मठापर्यंत तर दुसरीकडे भद्रावतीच्या बस स्टॉप पर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे महामार्गाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

error: Content is protected !!