गॅस सिलिंडरसाठी ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल
पहाटे ६ पासून रांगा, तरीही दिवसभर ताटकळत
भर उन्हात रांगा, तासन् तास प्रतीक्षा
वरोरा : “आम्ही रात्रंदिवस कष्ट करून पैसे भरतो, तरीही हक्काच्या गॅससाठी आम्हाला भिकाऱ्यांसारखे रांगेत उभे राहावे लागते,” ही संतप्त भावना आहे वरोरा येथील एका त्रस्त ग्राहकाची. वरोरा शहरात गॅस वितरणाच्या विदारक स्थितीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना नरकयातना सोसाव्या लागत असून, एजन्सीच्या नियोजनशून्य कारभारामुळे गरिबांची मजुरी आणि आरोग्य दोन्ही धोक्यात आले आहे.
पहाटे ६ पासून रांगा, कार्यालय उघडते ९ ला !
मिळालेल्या माहितीनुसार, गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिक पहाटे ६ वाजेपासूनच गॅस कार्यालयाबाहेर गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे, एजन्सीचे कार्यालय सकाळी ९ वाजता उघडते, तोपर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. कार्यालय उघडल्यानंतर नागरिकांची पुस्तके जमा करून घेतली जातात, मात्र सिलिंडर देण्यासाठी थेट सायंकाळी ५ वाजता बोलावले जाते. यामुळे ग्राहकांचे तब्बल ११ तास एका सिलिंडरसाठी खर्च होत आहेत.
![]()
मजुरी बुडाली, उन्हाचे चटके सोसले !
या रांगांमध्ये सर्वाधिक हाल खेड्यापाड्यांतून येणाऱ्या मजूर आणि शेतकऱ्यांचे होत आहेत. घरून एकदा शहरात आल्यावर पुन्हा परत जाणे परवडत नसल्याने, अनेक नागरिक भर उन्हात गॅस कार्यालयाच्या परिसरातच ताटकळत बसून राहतात. सावलीची कोणतीही सोय नसल्याने वृद्ध आणि महिलांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. दिवसभर रांगेत उभे राहावे लागत असल्याने मजुरीवर जाणाऱ्या कामगारांचा त्या दिवसाचा रोजगारही बुडत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांचा संताप !
“पुस्तके जमा केल्यावर लगेच सिलिंडर का दिले जात नाहीत ?” असा रास्त सवाल नागरिक विचारत आहेत. गॅस एजन्सीच्या या मनमानी कारभारावर स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण उरले नसल्याचे चित्र आहे. आता संबंधित विभाग या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन गॅस वितरणाची प्रक्रिया सुलभ करणार की नागरिकांचे हे हाल असेच सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


