मंदिर परिसरात विविध सुविधांची मागणी
वरोरा शहरातील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता पिण्याचे पाणी, सुशोभीकरण व शेडची कामे मार्गी लावण्याची विनंती
वरोरा : शहरातील हनुमान सेवा मंडळाच्या वतीने मंदिर परिसरात भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे मागणीचे निवेदन नगर परिषद मुख्याधिकारी तथा अध्यक्षांना देण्यात आले. प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची नुकतीच झालेली प्राणप्रतिष्ठा आणि हनुमान मूर्तीसह इतर देवतांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत असल्याने या सुविधांची तातडीने गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
. हनुमान सेवा मंडळाचे अध्यक्ष गजानन पुरकर, सचिव मनोहर स्वामी, उपाध्यक्ष सुरेश स्वामी, कोषाध्यक्ष डॉ. प्रकाश कोटेचा आणि सुनील शेंडे यांनी मुख्याधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. मंदिरात धार्मिक कार्यक्रमांमुळे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये मंदिरात अधिकृत नळ कनेक्शन देणे, तसेच समोरील मोकळ्या जागेत ट्यूबवेल (बोअरवेल) आणि आर.ओ. प्लांट बसविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
. याव्यतिरिक्त, आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या शेडचे उर्वरित काम पूर्ण करण्याबाबतही चर्चा झाली. शेडखालील जागेत टाईल्स बसविणे किंवा काँक्रीटीकरण करणे आवश्यक असून, याबाबत संबंधित ठेकेदाराला त्वरित निर्देश द्यावेत, अशी विनंती मंडळाने केली आहे. तसेच मंदिर समोरील मोकळ्या जागेचे सौंदर्यीकरण करून विकासकामे मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.
. या निवेदनाचा सकारात्मक विचार करून शक्य ती कामे तातडीने मार्गी लावण्याबाबत मुख्याधिकारी व अध्यक्षांनी अनुकूलता दर्शविली आहे. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने लवकर पावले उचलावीत, अशी अपेक्षा हनुमान सेवा मंडळाने व्यक्त केली आहे.


