Home सामाजिक चंद्रपूर जिल्ह्यासाठी ९ हजार कोटींचा वार्षिक पत आराखडा मंजूर

चंद्रपूर जिल्ह्यासाठी ९ हजार कोटींचा वार्षिक पत आराखडा मंजूर

128

कृषी क्षेत्राला २७५० कोटींचे बळ

जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे बँकांना कर्जवाटप प्रक्रियेत गती देण्याचे निर्देश

चंद्रपूर : आगामी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी चंद्रपूर जिल्ह्याचा एकूण ९ हजार कोटी रुपयांचा वार्षिक पत आराखडा (Annual Credit Plan) बुधवारी मंजूर करण्यात आला. जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. या नियोजित आराखड्यात कृषी क्षेत्राच्या विकासावर विशेष भर देण्यात आला असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

कृषी आणि प्राधान्य क्षेत्राला मोठे आर्थिक पाठबळ
मंजूर आराखड्यानुसार, जिल्ह्यासाठी एकूण ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. यात कृषी क्षेत्राला विशेष प्राधान्य देत २७५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये १३५० कोटी रुपये पीक कर्जासाठी (Crop Loan), तर १४०० कोटी रुपये कृषी मुदत कर्जासाठी (Term Loan) राखीव ठेवण्यात आले आहेत. याशिवाय, प्राधान्य क्षेत्रासाठी (Priority Sector) ५६९० कोटी रुपये आणि बिगर प्राधान्य क्षेत्रासाठी ३३१० कोटी रुपयांचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले आहे.

शेतकरी आणि मच्छिमारांना कर्जपुरवठ्याचे निर्देश
बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी बँकांना स्पष्ट सूचना दिल्या की, राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यामुळे बँकांनी आता शेतकऱ्यांना नवीन हंगामासाठी मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप करावे. तसेच, जिल्ह्यातील मच्छिमारांना तातडीने ‘किसान क्रेडिट कार्ड’ उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये खासगी बँकांनी आपला सहभाग वाढवून सुशिक्षित बेरोजगारांना मदत करावी, असेही त्यांनी नमूद केले.

प्रलंबित कर्ज प्रकरणे निकाली काढा
जिल्ह्यातील विविध आर्थिक विकास महामंडळांकडून बँकांकडे पाठवलेली लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे प्रलंबित न ठेवता ती तातडीने निकाली काढावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांच्या प्रतिनिधींना दिल्या. ग्रामीण भागातील आर्थिक विकास, महिला बचत गटांचे सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती हे या आराखड्याचे मुख्य सूत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

.      या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशिष पोरकुटे, नाबार्डचे मुख्य व्यवस्थापक तृणाल फुलझेले, जिल्हा उद्योग केंद्राचे उपमहाव्यवस्थापक खरमाटे यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!