२५ भव्य चित्ररथांनी वेधले भाविकांचे लक्ष
ऐतिहासिक श्रीराम शोभायात्रेत लाखो भक्तांचा जनसागर
सर्वधर्म समभावाचे दर्शन
चंद्रपूर : रामनवमीच्या पावन मुहूर्तावर चंद्रपूर शहरात भक्तीचा मळा फुलला असून, ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरातून निघालेल्या श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेने संपूर्ण शहर राममय झाले आहे. चंद्रपूरच्या समृद्ध परंपरेचा वारसा जपणारी ही शोभायात्रा यंदाही लाखो रामभक्तांच्या उपस्थितीत आणि उत्साहात पार पडली.
भक्ती आणि संस्कृतीचा संगम
शोभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी उभारलेली स्वागतद्वारे, आकर्षक रोषणाई आणि रामायणातील प्रसंगांचे देखावे भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले होते. मार्गावर ठिकठिकाणी भक्तांसाठी शरबत, मसाला भात आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. श्री काळाराम मंदिरातून सुरू झालेली ही यात्रा जोडदेऊळ चौक, गांधी चौक, जटपुरा गेट आणि कस्तुरबा चौक मार्गे पुन्हा मंदिराकडे मार्गस्थ झाली.
![]()
२५ चित्ररथांनी वाढविली शोभा
शोभायात्रेत स्केटींग पथक, प्रतिहारी दल, अश्वमेधाचा घोडा, शंखनाद दल, भजन मंडळी, आदिवासी नृत्य, रामायण मंडळ, राम संकीर्तन दल, जस गायन आदींसह, बांकेबिहारी दर्शन, चंद्रपूरची माता महाकाली दर्शन, पंचमुखी हनुमान, बैद्यनाथ ज्योतिर्लंग दर्शन, केदारनाथ धाम, महाकाली दर्शन, स्वामी समर्थ दर्शन, बालाजी दर्शन, कुंभकर्ण निद्रा, विष्णू अवतार, राधाकृष्ण सिंहासन, प्रयागराज महाकुंभ, वाल्मिकी रामायण रचना, शिवपार्वती विवाह, महर्षी सुदर्शन यांची आराधना, मारीच वध, तुळजा भवानी गोंधळ, महाकाल दर्शन, राम पंचायतन सजीव झांकी, गौमाता राजमाता दर्शन, नरसिंह अवतार, तुलसी रामायण कथा, भक्तीलीन हनुमान हे प्रमुख शोभायात्रेचे आकर्षण चित्ररथ होते.
प्रशासनाच्या वतीने शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, ज्यामुळे ही ऐतिहासिक शोभायात्रा शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात संपन्न झाली.


