खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सुषमा अंधारेंवर घणाघात
“चंद्रपुरात ‘शेण’ कोणी खाल्ले हे संजय राऊतांना विचारा”
महाविकास आघाडीतील कलगीतुरा रंगला
चंद्रपूर : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेला काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अत्यंत जळजळीत प्रत्युत्तर दिले आहे. “ज्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अनेकवेळा कात टाकली आणि जे आपल्या मूळ विचारांशी कधीच एकनिष्ठ राहू शकले नाहीत, त्यांनी आम्हाला निष्ठेच्या बाता मारू नयेत,” अशा शब्दांत धानोरकर यांनी अंधारेंचा समाचार घेतला.
लाईमलाईटसाठी केविलवाणी धडपड
सुषमा अंधारे यांच्या विधानाचा निषेध करताना खासदार धानोरकर म्हणाल्या की, केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी अंधारे यांची ही धडपड सुरू आहे. “दुसऱ्यांच्या घराकडे दगड फेकण्यापूर्वी आपले स्वतःचे घर काचेचे आहे, याचे भान त्यांनी ठेवावे. मुंबई महानगरपालिकेत कुणी कुणाची नाकाबंदी केली आणि भ्रष्टाचाराचे व्यवहार करून कुणाचे खिसे भरले, याचे उत्तर आधी त्यांनी जनतेला द्यावे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
संजय राऊतांना आरसा दाखवा
चंद्रपूरच्या राजकारणात दखल देणाऱ्या अंधारेंना सुनावताना धानोरकर यांनी थेट संजय राऊतांचे नाव ओढले. “चंद्रपुरात नेमके ‘शेण’ कोणी खाल्ले, हे विचारण्याची हिंमत असेल तर त्यांनी आपले नेते खासदार संजय राऊत यांना विचारावे, म्हणजे त्यांना खरा आरसा दिसेल. एखादे अपघाती यश मिळाले की इतके हुरळून जाऊ नये, अहंकाराची ही सूज लवकरच उतरेल,” असा टोलाही त्यांनी लगावला. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस आजही सर्वात मोठा आणि वरचढ पक्ष असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.
आघाडीचा धर्म पाळा, अन्यथा…
शेवटी अत्यंत कडक इशारा देताना प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, “महाविकास आघाडीत राहायचे असेल तर घटक पक्षांचा सन्मान राखायला शिका. आमच्या नेतृत्वावर किंवा काँग्रेसवर विनाकारण चिखलफेक केली, तर गाठ आमच्याशी आहे. आम्ही जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत. यापुढे तोंड सांभाळून बोला, अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा.”


