आईपासून दुरावल्याने खाल्ला पाला-पाचोळा
उपचारासाठी नेताना वाटेतच सोडला प्राण
भद्रावती : भद्रावती वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चांदा आयुध निर्माणीतील इंद्रप्रस्थ गार्डन मागील खापरी भागात एका बिबट्याच्या पिल्लाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रामटेके सोसायटीलगत साधारण ४ ते ५ महिने वयाचे हे पिल्लू अत्यंत अस्वस्थ स्थितीत आढळून आले होते.
. प्राथमिक माहितीनुसार, हे पिल्लू आपल्या आईपासून दुरावले होते. भुकेमुळे किंवा खाण्यापिण्याच्या सवयीत बदल झाल्यामुळे या पिल्लाने झाडांचा पाला-पाचोळा खाल्ला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वनविभागाला याची माहिती मिळताच पथकाने तातडीने धाव घेऊन पिल्लाला ताब्यात घेतले. त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील टीटीसी (TTC) केंद्रात हलवण्यात येत होते, मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.
. मृत्यूनंतर करण्यात आलेल्या उत्तरीय तपासणीत (Post-mortem) पिल्लाच्या घशात पाला-पाचोळा अडकल्याचे निष्पन्न झाले. याच कारणामुळे पिल्लाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष वनविभागाने काढला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे, वनरक्षक संदीप पारवे व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. चंद्रपूर येथील केंद्रात नियमानुसार पिल्लावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


