लोकप्रतिनिधीत्व – एक मोठी सामाजिक जबाबदारी
एखादा डॉक्टर चुकला तर रुग्णाचा जीव धोक्यात येतो, एखादा अभियंता चुकला तर इमारत कोसळते, एखादा शिक्षक चुकला तर संपूर्ण पिढी भरकटू शकते. पण एखादा लोकप्रतिनिधी जर जनतेने ठेवलेल्या विश्वासापासून दूर गेला आणि जनतेच्या समस्या विधानसभेच्या पटलावर मांडताना तो अपयशी ठरला तर त्याचे परिणाम केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाहीत, तर संपूर्ण जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच लोकप्रतिनिधीपद ही केवळ राजकीय जबाबदारी नसून जनतेच्या अपेक्षा, विश्वास आणि आशांचा भार वाहणारी मोठी सामाजिक जबाबदारी आहे. त्या विश्वासाचे भान ठेवत, जनतेच्या प्रश्नांना विधानसभेच्या पटलावर प्रभावीपणे मांडणारे काही लोकप्रतिनिधी आजही राजकारणात आदर्श निर्माण करताना दिसतात; त्यापैकी एक ठळक नाव म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार.
संसदीय आयुधांचा कल्पक वापर
महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले की, सभागृहात काही आवाज विशेष ठसठशीतपणे उमटतात. त्यापैकी एक ठाम, अभ्यासू आणि प्रभावी आवाज आ. सुधीर मुनगंटीवार यांचा असतो. लक्षवेधी सूचना, अशासकीय ठराव, चर्चा आणि पूरक प्रश्न यांसारख्या संसदीय आयुधांचा अत्यंत कल्पकतेने वापर करून सरकारचे लक्ष वेधून घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. एखाद्या अनुभवी नायकाप्रमाणे ते सभागृहात सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करताना दिसतात.
ऐतिहासिक ठराव आणि राष्ट्रीय अस्मिता
सध्याच्या अधिवेशनात त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याच्या मागणीसाठी अशासकीय ठराव मांडून एका ऐतिहासिक विषयाला पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणले. या ठरावावर सभागृहात सकारात्मक चर्चा होऊन राज्य सरकारतर्फे केंद्राकडे तसा प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन मिळाले. जनभावनेला अधिकृत मार्गाने विधानसभेच्या पटलावर मांडून त्यांनी आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीचा परिचय दिला आहे.
स्थानिक रोजगार आणि कामगार सुरक्षा: आक्रमक भूमिका
चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक प्रकल्पांमध्ये स्थानिक युवकांना ८० टक्के रोजगार मिळावा, ही मागणी त्यांनी अत्यंत आक्रमकपणे लावून धरली. याची दखल घेत उद्योगमंत्र्यांनी चंद्रपूरमध्ये ‘एमआयडीसी कौशल्य विकास केंद्र’ उभारण्याचे आश्वासन दिले. केवळ रोजगारच नव्हे, तर कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्नही त्यांनी तितक्याच ताकदीने मांडला. कोरपना येथील दालमिया सिमेंट कारखान्यातील अपघातात जखमी झालेल्या अक्षय कन्नाके आणि स्वाती उईके या कामगारांना किमान २५ लाख रुपयांची मदत मिळावी, ही मागणी त्यांनी रेटून धरली. परिणामी, सरकारने कंपनीला मदतीचे निर्देश दिले आणि कामगार सुरक्षा कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी आमदारांचा अभ्यासगट स्थापन करण्याची घोषणा केली.
बल्लारपूरचे ‘झायलरियम’ : पर्यटन आणि विज्ञानाचा संगम
बल्लारपूर येथे उभारण्यात येणाऱ्या ‘टिम्बर म्युझियम-झायलरियम’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी त्यांनी केलेली मांडणी ऐतिहासिक ठरली. अयोध्या राममंदिर आणि नवीन संसद भवनासाठी वापरल्या गेलेल्या चंद्रपूरच्या लाकडाचा वारसा जपण्यासाठी हे संग्रहालय मैलाचा दगड ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात या प्रकल्पाची घोषणा केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याला आता पर्यटन आणि संशोधनाच्या क्षेत्रात जागतिक ओळख मिळणार आहे.
निष्कर्ष: नव्या पिढीसाठी आदर्श कार्यशैली
विधानसभेत एखादा मुद्दा कसा मांडायचा, त्यातून ठोस निर्णय कसा पदरात पाडून घ्यायचा, याचे उत्तम कौशल्य आ. मुनगंटीवार यांच्याकडे आहे. म्हणूनच अनेक तरुण आमदार त्यांना आपला आदर्श मानतात. अनुभवाचा व्यासंग आणि संसदीय परंपरांची जाण यांचा त्रिवेणी संगम असलेल्या मुनगंटीवार यांच्या शैलीमुळेच विधानसभेचे मैदान आजही त्यांच्या अभ्यासू मांडणीने गाजताना दिसते. सत्तेच्या राजकारणापलीकडे जाऊन संसदीय प्रक्रियेला जनसेवेचे शस्त्र बनवणारा हा लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थाने जननायक ठरत आहे.


