नंदोरीतील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना साकडे
‘मुख्यमंत्री बळीराजा योजने‘तून रस्ता दुरुस्तीची मागणी
‘महाराजस्व समाधान शिबिरात‘ निवेदन सादर
चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील नंदोरी परिसरातील शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. सचिन नारायण लांबट यांच्या शेतापासून ते गुलाब विष्णू ताजणे यांच्या शेतापर्यंतचा पांदण रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा, या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून थेट प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. नंदोरी येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात’ तहसीलदार राजेश भांडारकर यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन देण्यात आले.
शेतीची कामे होणार ठप्प
सध्या या पांदण रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसाळ्यात या मार्गावरून बैलबंडी नेणे तर लांबच, साधे पायदळ चालणेही शेतकऱ्यांसाठी जीवघेणी कसरत ठरत आहे. रस्त्याअभावी खते आणि बियाणे शेतापर्यंत पोहोचवणे अशक्य होते, तसेच पिकवलेला माल बाजारात नेण्यासाठी अवाढव्य खर्च करावा लागतो. यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्त न झाल्यास शेती करणे कठीण होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बळीराजा योजनेतून लाभाची अपेक्षा
राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना (२०२६)’ जाहीर केली असून, या माध्यमातून ग्रामीण भागात बारमाही रस्ते देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याच योजनेचा आधार घेत, पावसाळा सुरू होण्यापूर्वी सदर रस्त्याचे खडीकरण किंवा काँक्रीटीकरण करावे, अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
. निवेदन सादर करताना शेतकरी उत्पादक महासंघाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील लांबट, आकाश मोंढे, पांडुरंग पावडे, उल्हास लांबट, देवीदास चामाटे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या मागणीवर प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


