Home सामाजिक चंदनखेडा येथे AI शास्त्रज्ञ सुरज भूते यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चंदनखेडा येथे AI शास्त्रज्ञ सुरज भूते यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

457

पिएमश्री शाळेचा अभिनव उपक्रम

शाश्वत विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानावर दिला भर

शिवजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन

भद्रावती : शाश्वत विकासासाठी युवकांची भूमिका आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय अधिव्याख्याता व एआय शास्त्रज्ञ सुरज भूते यांनी केले. भद्रावती तालुक्यातील पिएमश्री जि.प. उच्च प्राथमिक शाळा, चंदनखेडा येथे ‘पिएमश्री’ उपक्रमांतर्गत आयोजित विशेष मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.

.       कार्यक्रमाची सुरुवात तिथीनुसार असलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. मान्यवरांच्या स्वागतानंतर, सुरज भूते यांनी ‘शाश्वत विकासासाठी युवा’ आणि ‘एआय तंत्रज्ञान’ या विषयांवर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःला कसे अपडेट ठेवावे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे व प्रश्नांचे त्यांनी निरसन केले.

.       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता आईंचवार होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता हनवते यांनी केले, तर सूत्रसंचालन सुखदेव मेश्राम यांनी केले. आभार प्रदर्शन मंगला दडमल यांनी केले. या प्रसंगी शिक्षक गायकवाड, उईके, शेरकी यांच्यासह सर्व विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!