जेना घाटातून होणारी विनापरवाना वाहतूक महसूल पथकाने रोखली !
बोलेरो पिकअपसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
भद्रावती : तालुक्यातील रेती तस्करांविरुद्ध प्रशासनाने आता युद्धपातळीवर मोहीम उघडली आहे. आज, ७ मार्च २०२६ रोजी भरदुपारी ३:३० वाजताच्या सुमारास स्थानिक वृंदावन सभागृहाजवळ महसूल विभागाने सापळा रचून जेना घाटातून अवैध रेती घेऊन जाणारी बोलेरो पिकअप (क्र. MH 34 BZ 9303) पकडली. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथक सज्ज होते. जेना घाटावरून विनापरवाना रेती उपसा करून ही गाडी शहराच्या दिशेने येत असताना, पथकाने अत्यंत चाणाक्षपणे वृंदावन सभागृहाजवळ गाडीला घेराव घातला. तपासणी दरम्यान गाडीत अवैध रेती आढळून आल्याने ती तात्काळ जप्त करण्यात आली. सदर गाडी गजानन पिंपळकर यांच्या मालकीची असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे.
. ही धाडसी कारवाई नायब तहसीलदार मनोज आकनूरवार, मंडळ अधिकारी मनोज कुमार भोयर, ग्राम महसूल अधिकारी शुभम धात्रक, वामन राजूरकर आणि ताराचंद खोब्रागडे यांनी यशस्वी केली. शासनाचा महसूल बुडवून पर्यावरणाची हानी करणाऱ्यांविरुद्ध अशीच कठोर कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.


