मनीष जेठानी यांची गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे मागणी
वरोरा : शहर परिसरातील काही खाजगी शाळांमधून पुस्तके, नोटबुक आणि शालेय साहित्याची नियमबाह्य विक्री करून पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. शासकीय नियमांना धाब्यावर बसवून व्यावसायिकरण करणाऱ्या अशा शाळांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) जिल्हा संघटक तथा नगर परिषदेचे बांधकाम सभापती मनीष जेठानी यांनी वरोरा गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
शाळांचा ‘कमिशन‘चा हव्यास
वरोरा शहरातील सेंट ॲन्स पब्लिक स्कूल व हायस्कूल तसेच संस्कार भारती पब्लिक स्कूल या शाळांमध्ये मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शाळांची वार्षिक परीक्षा संपल्यानंतर निकालाच्या दिवशीच पुस्तके व शैक्षणिक साहित्य विकण्याचा घाट घातला जातो. विशेष म्हणजे, सक्तीने विकण्यात आलेली अनेक पुस्तके वर्षभर उघडली देखील जात नाहीत. केवळ कमिशनच्या हव्यासापोटी शाळा व्यवस्थापन पालकांना ठराविक संच घेण्याची सक्ती करून त्यांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचे जेठानी यांनी नमूद केले.
मनीष जेठानी यांच्या प्रमुख मागण्या
पालकांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी मनीष जेठानी यांनी प्रशासनाकडे अत्यंत महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, शाळा व्यवस्थापनाने पुढील शैक्षणिक सत्रासाठी लागणाऱ्या सर्व पुस्तकांची सविस्तर यादी शाळेच्या दर्शनी भागावर (नोटीस बोर्ड) लावावी किंवा सदर यादी शिक्षण विभागाकडे सुपूर्द करावी, जेणेकरून पालकांना आपल्या सोयीनुसार कुठूनही पुस्तके खरेदी करता येतील. तसेच, शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर किमान दहा दिवसांपर्यंत विद्यार्थ्यांना पुस्तके व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी मुदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शाळांनी कोणत्याही प्रकारे साहित्याची सक्ती करू नये आणि शाळा परिसरातून होणारी अनधिकृत विक्री त्वरित बंद करावी, असा आग्रह त्यांनी धरला आहे.
पुस्तके जप्त करून मोफत वाटण्याचा इशारा
शैक्षणिक संस्था या व्यवसायिक नसून सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था आहेत. मात्र, नियमांचे उल्लंघन करून जर शाळा परिसरातून पुन्हा साहित्य विक्री होताना आढळली, तर आक्रमक पवित्रा घेत सदर पुस्तके ताब्यात घेऊन विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात येईल, असा खणखणीत इशारा मनीष जेठानी यांनी या निवेदनातून दिला आहे.


