ग्राहक पंचायत महाराष्ट्रची भद्रावती महावितरणकडे मागणी
ऑगस्ट २०२५ पासून बिले न मिळाल्याने ग्राहक संतापले
दोषी खाजगी कंपनीवर कारवाईचे संकेत
भद्रावती : भद्रावती शहरातील गौतम नगर परिसरातील सोलर वीज मीटर ग्राहकांना गेल्या अनेक महिन्यांपासून वीज बिले न मिळाल्याने ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा भद्रावतीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन नियमित बिल वितरणाची मागणी करण्यात आली.
. गौतम नगरातील सोलर ग्राहकांना ऑगस्ट २०२५ पासून वीज बिले प्राप्त झालेली नाहीत. याबाबत ग्राहकांनी ग्राहक पंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत, सप्टेंबर महिन्यापासूनची प्रलंबित बिले तातडीने वितरित करावीत आणि भविष्यात असा खंड पडणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच, या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या खाजगी कंपनीवर कडक कारवाई करण्याची स्पष्ट तंबीही देण्यात आली.
. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा भद्रावतीचे अध्यक्ष प्रवीण चिमूरकर, उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार, कोषाध्यक्ष भारत खोब्रागडे, सहसचिव करुणा मोघे, संघटक सोनल वावरे, सदस्य विनोद ठमके व प्रतीक्षा बनकर उपस्थित होते.


