वरोरा पोलिसांकडून २४ तासांत आवळल्या मुसक्या
रेल्वे उड्डाणपुलाच्या कामावरील ८५ सिमेंट गोण्यांची झाली होती चोरी
चोरीसाठी चक्क चारचाकी वाहनाचा केला वापर
४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश
वरोरा : वरोरा-वणी रोडवरील उड्डाणपुलाजवळ सुरू असलेल्या रेल्वेच्या कामावरील सिमेंट चोरी करणाऱ्या आरोपीला वरोरा पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. विशेष म्हणजे, सिमेंट चोरण्यासाठी आरोपीने थेट चारचाकी वाहनाचा वापर केला होता. पोलिसांनी २४ तासांच्या आत तपास चक्रे फिरवून आरोपीसह ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नेमकी घटना काय ?
वणी रोडवरील उड्डाणपुलाजवळ रेल्वे ट्रॅकचे काम सुरू आहे. या कामासाठी कंत्राटदाराने ८५ सिमेंटच्या गोण्या आणून ठेवल्या होत्या. मात्र, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या २९ हजार रुपये किमतीच्या सिमेंट गोण्या लंपास केल्या. सिमेंट चोरीला गेल्याचे लक्षात येताच कंत्राटदार राहुल रजत यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
सीसीटीव्ही फुटेजमुळे लागला छडा
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान समोर आले की, आरोपीने सिमेंटची वाहतूक करण्यासाठी स्वतःच्या चारचाकी वाहनाचा वापर केला होता. पोलिसांनी या कारवाईत आरोपीकडून चोरीच्या सिमेंट गोण्यांसह गुन्ह्यात वापरलेली चारचाकी आणि एकूण १०० सिमेंट गोण्या असा ४ लक्ष ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस पथकाची कामगिरी
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वात सपोनि शरद भस्मे, पोलीस कर्मचारी संदीप मुळे, विशात राजूरकर, सौरभ कुलथे, सूकराज यादव व नवघरे यांनी केली आहे. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे.


