Home चंद्रपुर जिल्हा विशेष भरधाव कॅप्सूल ट्रकने माय-लेकाला चिरडले

भरधाव कॅप्सूल ट्रकने माय-लेकाला चिरडले

370

३ वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू

आईची प्रकृती चिंताजनक

वरोरा जवळील टेमुर्डा येथील हृदयद्रावक घटना

वरोरा : नागपूर-चंद्रपूर महामार्गावर बुधवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. आपल्या चिमुरड्या मुलासह पायी जात असलेल्या मातेला भरधाव येणाऱ्या कॅप्सूल ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ३ वर्षांच्या निष्पाप साहिलचा जागीच अंत झाला, तर त्याची माता मृत्यूशी झुंज देत आहे.

नेमकी घटना काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, टेमुर्डा येथील रहिवासी सोनू संजय शेळके (२५) या बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास आपला ३ वर्षांचा मुलगा साहिल याला घेऊन महामार्गाच्या कडेने जात होत्या. याच दरम्यान, नागपूरकडून चंद्रपूरच्या दिशेने अत्यंत वेगाने येणाऱ्या कॅप्सूल ट्रकने (क्रमांक MH 12 UM 7339) त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की माय-लेक रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर फेकले गेले.

रुग्णालयात नेण्यापूर्वीच साहिलचा मृत्यू
स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत दोघांनाही वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच साहिलचा मृत्यू झाला होता. सोनू शेळके यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचार देऊन तातडीने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

परिसरात तणाव आणि संताप
या घटनेनंतर टेमुर्डा परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महामार्गावर वाढलेली अवजड वाहतूक आणि चालकांचा निष्काळजीपणा निष्पाप जीवांच्या मुळावर येत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ट्रक जप्त केला असून, आरोपी चालकाला ताब्यात घेतले आहे.

error: Content is protected !!