Home सामाजिक खा. प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन

खा. प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन

396

चंद्रपुरात काँग्रेसने फुंकले निवडणुकीचे रणशिंग !

चंद्रपूर : आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने शहरात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सोमवार, ५ जानेवारी २०२६ रोजी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते विविध प्रभागांतील अधिकृत उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयांचे थाटात उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयांच्या माध्यमातून काँग्रेसने महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

.       चंद्रपूर महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी पक्षाचे सर्वच उमेदवार आता पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत. सोमवारी शहराच्या विविध भागांत या कार्यालयांचे उद्घाटन सोहळे पार पडले. यामध्ये गांधी चौक येथील रितेश (रामू) तिवारी, विठ्ठल मंदिर वॉर्डातील सौरभ ठोंबरे, रहम्मत नगरमधील सोहेल रजा, जटपूरा गेट येथील अश्विनी खोब्रागडे, तुकूम शास्त्रीनगरमधील अनु दहेगावकर, तुकूम येथील प्रशांत भारती व प्रतिभा पेंदोर तसेच आझाद चौक येथील प्रणय धोबे यांच्या कार्यालयांचा समावेश होता.

.       यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पक्षाची जनहितार्थ ध्येय-धोरणे आणि आगामी निवडणुकीसाठीची प्रभावी रणनीती स्पष्ट केली. “शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात जनसंपर्क वाढवून जनतेच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी हे सर्व उमेदवार कटिबद्ध राहतील,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

.        या उद्घाटन समारंभाला आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेस शहर अध्यक्ष संतोष लहामगे, महिला जिल्हाध्यक्ष कुंदा जेणेकर, तालुका अध्यक्ष अनिल नरुले, प्रवीण पडवेकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठिकठिकाणी उमेदवारांनी खासदारांचे जल्लोषात स्वागत केले. खासदार धानोरकर यांनी सर्व उमेदवारांना विजयासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देऊन निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले.

error: Content is protected !!