> अनुभवी पुरुष ऑपरेटरना घरचा रस्ता
> करारामध्ये उल्लेख नसतानाही कारवाई
वरोरा : वरोरा तहसील कार्यालयातील सेतू केंद्रा मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या दोन पुरुष ऑपरेटरना अचानक कामावरून कमी केल्याने आणि एकाने राजीनामा दिल्याने सेतू केंद्राचा कारभार विस्कळीत झाला आहे. नवीन नियुक्त महिला कर्मचाऱ्यांना कामाचा पुरेसा अनुभव नसल्याने प्रमाणपत्रांसाठी येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
. चंद्रपूर जिल्ह्यातील सेतू केंद्रांचे कंत्राट २०१७ पासून महिला आर्थिक विकास महामंडळ कडे आहे. वरोरा येथील केंद्राची जबाबदारी ‘सावित्री लोकसंचलित साधन केंद्रा’ कडे देण्यात आली आहे. मूळ करारामध्ये ऑपरेटर महिला असावी की पुरुष, असा कोणताही स्पष्ट उल्लेख नाही. असे असतानाही वरोरा केंद्रातील दोन पुरुष ऑपरेटरना कामावरून काढण्यात आले, तर एकाने राजीनामा दिला. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये आजही पुरुष ऑपरेटर कार्यरत आहेत, मग वरोरामध्येच हा भेदभाव का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या सेतू केंद्रात विविध शासकीय प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. जुन्या अनुभवी ऑपरेटरना काढल्यामुळे आणि नवीन कर्मचाऱ्यांना शासन निर्णयांची (GR) पुरेशी माहिती नसल्यामुळे कामाचा वेग मंदावला आहे.
. यामुळे विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे वेळेत काम न होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर सामान्य प्रशासन विभागाच्या १४ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार, सेतू केंद्राचे कंत्राट ३ वर्षांसाठी असावे आणि जास्तीत जास्त २ वर्षे मुदतवाढ देता येते. म्हणजेच एकूण ५ वर्षांनंतर नवीन निविदा प्रक्रिया राबवणे बंधनकारक आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात २०१७ पासून म्हणजेच तब्बल ९ वर्षांपासून एकाच महामंडळाकडे हे कंत्राट आहे. हा प्रकार शासन निर्णयाची सरळ अवहेलना असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
“सेतूच्या करारामध्ये महिला किंवा पुरुष असा कोणताही विशिष्ट उल्लेख नसताना केवळ पुरुषांना कामावरून काढणे पूर्णतः चुकीचे आहे. या अन्यायाविरुद्ध आम्ही संपूर्ण जिल्ह्यातील पुरुष ऑपरेटरच्या वतीने न्यायालयात दाद मागणार आहोत.” हितेश भालेराव, (सेतू समन्वयक)


