सहा सावकारांवर गुन्हा दाखल
नागभीड तालुक्यातील मिंथुर गावातील संतापजनक प्रकार
अवैध सावकारी प्रकरणी ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
चंद्रपूर : कर्जाचा परतावा मिळविण्यासाठी एका शेतकऱ्याला चक्क किडनी विकण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. नागभीड तालुक्यातील मिंथुर गावातील शेतकरी रोशन सदाशिव कुडे यांनी केलेल्या आरोपानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत युद्धपातळीवर तपास सुरू केला असून, सायंकाळी सात वाजता सहा सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
. या प्रकरणात आरोपी किशोर बावनकुळे, मनीष घाटबांधे, लक्ष्मण उरकुडे, प्रदीप बावनकुळे, संजय बल्लारपूरे व सत्यवान बोरकर यांच्यावर अवैध सावकारीसंदर्भातील कलम 29, 31 व 32 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पीडित शेतकऱ्याने केलेल्या किडनी विक्रीच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच किडनी कर्जफेडीसाठीच विकली का, कंबोडिया येथे जाऊन किडनी का विकावी लागली, त्यासाठी माहिती व व्यवस्था कुणी केली, तसेच तो तेथे कसा गेला, या सर्व बाबींचा सखोल तपास केला जाणार आहे. त्यामुळे किडनी विक्रीसंदर्भात सध्या स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून अवैध सावकारीविरोधात पुन्हा एकदा कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.


