लाखो रुपयांचा बनावट तंबाखू सह मुद्देमाल जप्त
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून कारवाई
वरोरा पोलिसांना मोठे यश
चंद्रपूरमधील दोघांना अटक
रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे आव्हान
वरोरा : शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर वरोरा पोलिसांनी बुधवारी (दि. ३ डिसेंबर) मोठी कारवाई करत लाखो रुपये किमतीचा बनावट सुंगधित तंबाखू आणि पान मसाला जप्त केला आहे. याप्रकरणी चंद्रपूर येथील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, जप्त केलेल्या मालाची मोजणी मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. बनावट उत्पादनांचे हे मोठे रॅकेट उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
. मिळालेल्या माहितीनुसार, नुकताच नगर पालिकेचा लोकशाही उत्सव पार पडला. नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यादरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी जिजामाता प्रभागात फिरत असताना, परिसरातील महिलांनी आपल्या भागात नियमितपणे बनावट तंबाखू आणि पान मसाला येत असल्याची तक्रार केली. नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असलेल्या या गोरखधंद्याची गंभीर दखल घेत शिवसेनेचे लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे आणि जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी स्वतः यावर लक्ष केंद्रित केले. आणि बुधवारच्या संध्याकाळच्या सुमारास शहरालगतच्या एकार्जुना परिसरात सापळा रचला. नेमक्या त्याच वेळी बनावट माल घेऊन येणारे अशोक लेलॅण्ड कंपनीचे एक पिकअप वाहन येत असताना शिवसैनिकांनी ते अडवले. वाहनाची चौकशी केली असता, त्यात नामवंत कंपन्यांच्या नावाचा बनावट सुंगधित तंबाखू आणि पान मसाला मोठ्या प्रमाणात आढळला. शिवसैनिकांनी तातडीने वरोरा पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. चौकशीत हा बनावट माल चंद्रपूर येथून आणण्यात येत असल्याची माहिती समोर आली. या रॅकेटमधील व्यापाऱ्यांनी शहरालगतच्या एकार्जुना येथील अजय रमेश कामडी यांच्या घरी एक खोली भाड्याने घेतली होती आणि येथेच काही माल उतरवून पुढे वितरण केले जात होते. पोलिसांनी याप्रकरणी मिथुन घोटेकर (रा. पंचशील चौक, जटपुरा गेट, चंद्रपूर) आणि अनिल बोधे या दोघांना अटक केली आहे.
लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी जप्त केलेल्या सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याच्या पुड्या, पाकिटे आणि बॉक्सची मोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सहायक पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी सुनील पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेला मुद्देमाल लाखो रुपयांच्या घरात असून, नेमकी किंमत मोजणी पूर्ण झाल्यावर स्पष्ट होईल.
”हा बनावट माल आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. आम्ही अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी करत आहोत. हे रॅकेट कुठपर्यंत पसरले आहे, याचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि चंद्रपूर ते वरोरा या वितरण साखळीत आणखी कोण सामील आहे, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल,” अशी माहिती तपास अधिकारी सुनील पाटील यांनी दिले आहे.

