Home चंद्रपुर जिल्हा विशेष बल्लारपुरात ‘विकासाचा पत्ता, महिलांच्या हाती सत्ता’ !

बल्लारपुरात ‘विकासाचा पत्ता, महिलांच्या हाती सत्ता’ !

519

निवडणुकीत लढले जाणार केवळ पाच दिवस शाब्दिक युद्ध

उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

अनेकश्वर मेश्राम
 बल्लारपूर :  नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक येत्या २ डिसेंबरला होत आहे.यासाठी सोमवार पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. नगरपालिकेत अध्यक्ष पद नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलासाठी राखीव आहे. त्याच प्रमाणे १७ प्रभागातून 34 नगरसेवकांपैकी १७ महिला नगरसेवक होण्यासाठी उत्सुक आहेत. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील ५, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ५, सर्वसाधारण ६ आणि अनुसूचित जमाती महिला १ अशा एकूण १७ जागा महिलासाठी आरक्षीत आहे. यामुळे बल्लारपूर येथे ‘विकासाचा पत्ता, महिलांची हाती सत्ता’ असा अनुभव नागरिकांना येत आहे.

.      चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर नगरपालिका सर्वात मोठी असून मतदारांची संख्या ८४ हजारांच्या आसपास आहे. औद्योगिक शहर असलेल्या बल्लारपूर शहर रेल्वे स्थानकामुळे दक्षिण भारताचे प्रवेशद्वार आहे. याची ओळख ‘मिनी भारत’ देखील असून सर्व प्रातांतील नागरिकांचे वास्तव्य येथे आहे. शहरातील औद्योगिकीकरणामुळे ही ओळख निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे जागतिक दर्जाचा बिल्ट ग्राफिक पेपर उद्योग समूह येथे आहे. यामुळे जिल्ह्याची अर्थ वाहिनी बल्लारपूर शहर ठरले आहे. याला जोड मध्य चांदा वन विभागाच्या काष्ठ भंडाराची मिळाली आहे.

.      बल्लारपूर नगरपालिकेत एकूण १७ प्रभागातून 34 नगरसेवकांची निवड मतदार करणार आहे. त्याचप्रमाणे थेट मतदारांतून नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी मतदारांनी सज्जता सुरू केली आहे. राजकीय पक्षांची नगराध्यक्ष पद व १७ प्रभागातील 34 नगरसेवकांची निवड प्रक्रिया जोमाने सुरु केली आहे. १७ नोव्हेंबर ला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.विशेष म्हणजे यावेळी मतदारांना निवडणुकीतील उमेदवारांचे प्रचारातील शाब्दिक युद्ध केवळ पाच दिवस अनुभवता येणार आहे.

राखीव जागेवरील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र द्यावे लागणार                                                                                                                                                                                       नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक राखीव जागेवर लढणाऱ्या उमेदवाराला निवडून आल्यावर जात वैधता प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. यामध्ये नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाची निवडणूक लढणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवाराला निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करावे लागेल. उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी जिल्हा जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केल्याची पावती जोडली,तरी राखीव जागेवर निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरले जाणार आहे.यासाठी उमेदवारांची लगबग सुरु झाली आहे. निवडणुकीत प्रचार कालावधी कमी असल्याने अपक्ष उमेदवारांची निवडणूक दरम्यान दमछाक होणार आहे. याचा फायदा राजकीय पक्षांच्या उमेदवारांना होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!