जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक
उमेदवार निवडीसाठी राजकीय खलबत्ते
अनेकश्वर मेश्राम
बल्लारपूर : तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समितीचे गण आहे. यासाठी राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी उमेदवार निवडीसाठी खलबत्ते सुरू केले आहे. आगामी सार्वत्रिक निवडणूक दरम्यान बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव झाले आहे. यामुळे पळसगाव गणाकडे साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहे. आता बल्लारपूर तालुक्यात भाजपा व कांग्रेस पक्षात थेट लढतीचे संकेत मिळाले असून भाजपाचे नेते वर्चस्वाच्या लढाईसाठी प्रयत्न करत आहे.
. बल्लारपूर तालुक्यात विसापूर – बामणी गटात एकूण मतदार १७ हजार ९3७ आहेत. हा गट सर्वसाधारण महिलासाठी आरक्षीत झाला असून या गटात भाजपाकडून माजी जि. प. सदस्य अंजली पंदीलवार, मंजुताई देऊळकर, विद्या देवाळकर, तर कांग्रेसपक्षाकडून उषा गिरडकर, नम्रता ताजने व समीक्षा भटवलकर यांची नावे चर्चेत आहेत. पळसगाव – कोठारी गटात एकूण १८ हजार २१४ मतदार असून हा गट देखील सर्वसाधारण महिलासाठी राखीव आहे. या गटात भाजपाकडून वैशाली बुद्धलवार, माजी सभापती चंद्रकला बोबाटे, माजी उपसभापती सुमन लोहे,तर कांग्रेस कडून सोनाली भास्कर कावळे व अर्चना सुरेश वासाडे यांची दावेदारी पुढे आल्याची चर्चा आहे. दोन्ही जिल्हा परिषद गटात भाजपा व कांग्रेस पक्षात तुल्यबळ लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
. बल्लारपूर पंचायत समिती मध्ये चार गण असून सभापती पद अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव आहे. यामुळे पंचायत समितीवर सत्ता प्राप्त करण्यासाठी सावध पवित्रा घेतला जात आहे. विसापूर गण सर्वसाधारण राखीव असून मतदारांची संख्या ८ हजार १0७ इतकी आहे. येथे बहुरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. बामणी गणाचे आरक्षण नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला (ओबीसी) असे आहे. येथे मतदारांची संख्या ९ हजार ८30 इतकी आहे. पळसगाव गण अनुसूचित जमाती सर्वसाधारण राखीव असून येथून विजयी होणाऱ्याला सभापती पद मिळणार असल्याने येथील लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. या गणात मतदारांची संख्या ९ हजार 3२६ इतकी आहे. कोठारी गणाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलासाठी (एससी) असे आहे. येथे मतदारांची संख्या ८ हजार ८८८ इतकी आहे. पंचायत समिती गणात आजतागायत लढतीचे चित्र भाजपा व कांग्रेस असेच आहे. यामुळे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात भाजप व कांग्रेस असेच लढतीचे संकेत आगामी सार्वत्रिक निवडणूक दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बल्लारपूर तालुक्यात २0१७ मधील विजयी शिलेदार
- विसापूर – बामणी गट : ॲड.हरीश गेडाम, भाजपा
- पळसगाव – कोठारी गट : वैशाली बुद्धलवार, भाजपा
- विसापूर गण : विद्या हरीदास गेडाम, भाजपा
- बामणी गण : गोविंदा पांडुरंग पोडे, भाजपा
- पळसगाव गण : इंदिरा रमेश पिपरे, भाजपा
- कोठारी गण : सोमेश्वर पदमगिरीवार, भाजपा


