Home चंद्रपुर जिल्हा विशेष उभ्या सोयाबीन पिकात चालवीला ट्रॅक्टर

उभ्या सोयाबीन पिकात चालवीला ट्रॅक्टर

563

उपविभागीय अधिकाऱ्यांसमोरच शेतकऱ्यांचा आक्रोश !

गेल्या तीन वर्षांपासून सोयाबीन पिकाचे अपयश

तुटपुंज्या मदतीवर बळीराजाचा प्रश्नचिन्ह

बोगस बियाण्यांवर शेतकऱ्यांचा संताप

भद्रावती : गेल्या तीन वर्षांपासून सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त केले असून यावर्षी तर परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. नंदोरी येथील प्रगतशील शेतकरी नरेंद्र जिवतोडे यांच्या शेतात तसेच परिसरातील इतर शेतांमध्ये सोयाबीन पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. लागलेला खर्च भरून निघत नाही, उलट कापणीसाठी अधिकचा खर्च करावा लागत आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरविला.

.      भद्रावती तालुक्यातील नंदोरी गावात गुरुवारी उपविभागीय कृषी अधिकारी कविता हरिणखेडे यांच्या उपस्थितीत उभ्या सोयाबीन पिकात ट्रॅक्टर चालविण्यात आला असून तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचा आक्रोश कृषी विभागासमोर व्यक्त झाला आहे.

.      या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने नुकतीच नंदोरी येथे पिकांची पाहणी केली. या पाहणीस उपविभागीय कृषी अधिकारी कविता हरिणखेडे, उपकृषी अधिकारी इड्डे, तलाठी लोंढे आणि कृषी सहायक पवन रहाणे हे उपस्थित होते. यावेळी शेतकरी नरेंद्र जिवतोडे, सुधाकर जिवतोडे, सुनील उमरे, मनीष ठक, परशुराम डाहुले, रमेश तिखट, आकाश मोंढे, आनंदराव जिवतोडे, रमेश झाडे, भास्कर जिवतोडे, प्रकाश निबरड, कपिल रांगणकर, गुड्डू एकरे, स्वप्नील वासेकर यांसह शेकडों शेतकरी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या.

.      शेतकऱ्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन पिकात केवळ नुकसानच होत आहे. यावर्षी पाने अजून हिरवी आहेत, पण शेंगा सुकल्या आहेत. हा प्रकार नेमका यलो मोजॅकचा परिणाम आहे की मुळखुज बुरशीचा, याचे निदान कृषी विभागालाही झालेले नाही. शेतकऱ्यांचा आरोप आहे की बोगस बियाण्यांचा मोठा बाजार निर्माण झाला असून यावर कृषी विभागाचे नियंत्रण नाही. शासनाने जर नामनिर्देशित बियाण्यांचा पुरवठा केला असता तर आज ही अवस्था निर्माण झाली नसती, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

.        पिकांची पाहणी केल्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी कविता हरिणखेडे यांनी सांगितले की, नंदोरी येथे पाहणीदरम्यान ८० ते ९० टक्के नुकसान स्पष्ट दिसून आले आहे. पाने हिरवी असली तरी शेंगा सुकल्या असून धान्याचे वजन अत्यल्प आहे. अतिवृष्टं येलो मोर्जेक आणि मुळखुज बुरशी या तिन्हींचा परिणाम एकत्रित दिसत आहे. या नुकसानाचे आकडे वरच्या स्तरावर पाठविले आहेत.

.      तुटपुंज्या मदतीने आणि अपुर्या नियोजनामुळे शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल का, हा प्रश्न या घटनानंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कृषिप्रधान देशातच आज शेतकरी सर्वाधिक पीडित असल्याचे वास्तव या घटनेतून समोर आले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून सोयाबीन पिकाचे संकट सुरू आहे. या वर्षी तर शंभर टक्के नुकसान झाले आहे. खर्च भरून निघत नसल्याने उभ्या पिकात ट्रॅक्टर चालविण्याची वेळ आली आहे. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असून शासनाने नामनिर्देशित बियाण्यांचा पुरवठा अनिवार्य करावा. तसेच रब्बी हंगामातील चना पिकांवर या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तातडीने मार्गदर्शन व नियोजनबद्ध मदत देणे गरजेचे आहे.                                                                                                                                                                                                      नरेंद्र जिवतोडे,                                                  जिल्हाध्यक्ष, शेतकरी उत्पादक महासंघ, चंद्रपुर

error: Content is protected !!