भाजपचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा काँग्रेस प्रवेश
नागपूरमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व खा. प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत भव्य प्रवेश सोहळा
वरोरा : वरोरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, भाजपचे माजी जिल्हा सचिव आणि भाजप अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष अहेतेशाम अली यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात भव्य प्रवेश केला. नागपूर येथील प्रेस क्लबमध्ये झालेल्या या प्रवेश सोहळ्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
. अहेतेशाम अली हे राजकारणात एन.एस.यू.आय. व युवक काँग्रेसच्या माध्यमातून उदयास आलेले नाव आहे. ते पूर्वी काँग्रेसचे वरोरा शहराध्यक्ष होते. माजी मंत्री व स्वर्गीय संजय देवतळे यांच्या सोबत त्यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये त्यांनी दहा वर्षांच्या काळात सक्रिय भूमिका निभावली.
. २०१६ च्या वरोरा नगर परिषद निवडणुकीत ते भाजपच्या चिन्हावर जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते प्रहार संघटनेकडून लढले होते. त्यांनी २१ हजारांहून अधिक मते मिळवत आपल्या जनाधाराचे प्रदर्शन केले होते.
. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, तसेच चंद्रपूर लोकसभेच्या धाडसी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाने प्रेरित होऊन त्यांनी काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेशाचा निर्णय घेतला.
. या भव्य सोहळ्याला भद्रावती भाजप तालुकाध्यक्ष तुलशीराम श्रीरामे, दादा झाडे, अशरफ खान (जिल्हा महासचिव, रा. काँ. पक्ष, माजरी), बंडू लभाने, अनिल खडके (माजी सरपंच), मारोती झाडे (माजी सरपंच, टेमुर्डा), गणेश जोगी (सदस्य, ग्रामपंचायत फत्तापूर), जयंत चंदनखेडे, सुभाष वाटकर (भाजप, बोर्डा), चंद्रकलाताई मते (अध्यक्ष, महिला गुरुदेव सेवा मंडळ, वरोरा) यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
. या प्रवेशामुळे वरोरा-भद्रावतीसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळ मिळणार असून, खासदार प्रतिभा धानोरकर यांचे हात अधिक मजबूत झाल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


