रवींद्र शिंदे भाजपमध्ये, अध्यक्षपदावर दावा
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावर वर्चस्वासाठी सध्या जोरदार शह-काटशह सुरू असून, या राजकीय रणसंग्रामात भाजपने आता धाडसी पाऊल उचलत शिवसेना (उबाठा) गटाचे जिल्हा प्रमुख व सहकार क्षेत्रातील मातब्बर नेते रवींद्र शिंदे यांना आपल्या गोटात खेचल्याने काँग्रेसच्या हातात तुरी देऊन शिंदे भाजपमय झाले.
. सहकारी बँकेतील घोटाळ्याची एसआयटी चौकशी सुरू असताना नुकत्याच पार पडलेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत भाजप समर्थित ९ उमेदवार विजयी झाले. मात्र, बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा म्हणजे ११. या दोन जागांसाठी भाजपकडे पर्याय कमीच होते, पण अचानक रवींद्र शिंदे यांचं नाव चर्चेत येताच राजकीय समीकरणंच बदलताना दिसत आहेत. विश्वसनीय सूत्रांनुसार, भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांनी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिंदे यांच्यासोबत ‘क्लोज डोअर’ चर्चा घडवून आणली. या चर्चेनंतर रवींद्र शिंदे यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांना हात जोडत भाजपशी हात मिळवणी करत भाजप प्रवेश केल्याने एकच खळबळ माजली.
. या प्रवेशानंतर रविंद्र शिंदे अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार ठरतील, तर उपाध्यक्षपदासाठी चिमूरचे डोंगरे यांचं नाव चर्चेत आहे. यामुळे जिल्हा बँकेवर भाजपचा ताबा निश्चित होणार आहे. असा विश्वास भाजप गोटात व्यक्त केला जात आहे.
‘शिंदे म्हणजे सहकारातील ट्रम्प कार्ड’ वरोरा-भद्रावती मतदारसंघातील रवींद्र शिंदे हे गेली अनेक वर्षे सहकार क्षेत्रातील निर्णायक नेता म्हणून ओळखले जातात. त्यांनी स्व. खासदार बाळू धानोरकर यांना या क्षेत्रात पाय रोवू दिला नव्हता. त्यांच्या नेतृत्त्वाखाली दोन्ही बाजार समित्यांवर विजय मिळवून त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. भाजपला आता केवळ बँकेवर सत्ता मिळवायची नाही, तर संपूर्ण सहकार क्षेत्रावर वर्चस्व गाजवायचं आहे आणि त्या रणनितीत शिंदे ‘ट्रम्प कार्ड’ ठरू शकतात.
शिवसेना (उबाठा) ला जय महाराष्ट्र शिंदे यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेना (उबाठा) गटामध्ये मोठी धुसफूस निर्माण झाली आहे. जिल्हा प्रमुखपदासह अनेक निष्ठावंतांची भूमिका अडचणीत येऊ शकते. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकी नंतर शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ते बँकेचे अध्यक्ष म्हणून रुजू होतील, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.


