शिवणी येथील घरावर छापा
३ लाखांचा मुद्देमाल जप्त
कृषी व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई
बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता
गोंडपिपरी : कापूस हंगाम तोंडावर असताना गोंडपिपरी तालुक्यात बोगस बिटी बियाण्यांचा मोठा साठा पकडण्यात आला आहे. कृषी विभाग आणि पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने शिवाजी चौक परिसरात धाड टाकून २०० किलो चोर बिटी बियाण्यांचा साठा हस्तगत केला. या कारवाईत सुमारे ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बियाण्यांचा बेकायदेशीर साठा करणाऱ्या अरविंद तुळशीराम जुनारकर (वय ३४, रा. शिवणी, ता. गोंडपिपरी) याच्याविरुद्ध बियाणे अधिनियम आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुका सीमेलगत असल्याने वाढली बोगस बियाण्यांची घुसखोरी गोंडपिपरी तालुका हा तेलंगणा सीमेलगत असल्याने येथे चोर मार्गाने प्रतिबंधित बिटी बियाण्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याची माहिती आहे. मागील वर्षी तालुक्यात तब्बल १८ हजार हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली होती. त्यामुळे बोगस बियाण्यांचा धोका अधिक वाढल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
पोलिस व कृषी विभाग ॲक्टिव्ह मोडमध्ये गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीची गंभीर दखल घेत संध्याकाळी ७ वाजता छापा टाकण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, तसेच कृषी विभागाचे उमेश घाटगे, शंकर तोटावार, वीरेंद्र राजपूत यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. कारवाईत ठाणेदार रमेश हत्तीगोटे, कृषी अधिकारी सचिन पानसरे, कोसनशिले, प्रशांत नैताम, सचिन गायकवाड यांनी पुढाकार घेतला.
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना विनंती केली आहे की, बोगस बियाण्यांपासून बचाव करण्यासाठी फक्त अधिकृत कृषी सेवा केंद्रांमधूनच बियाण्यांची खरेदी करावी. तसेच कोणत्याही संशयास्पद हालचालीची माहिती तात्काळ स्थानिक पोलिस किंवा कृषी विभागास द्यावी.
शेतीच्या हंगामात अशा कारवाया अत्यंत गरजेच्या आहेत. या कारवाईमुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळणार असून, भविष्यातील नुकसान टाळले जाणार आहे. सुरज माडूरवार, तालुका प्रमुख, शिवसेना (उबाठा)


