सरपंच दिलीप मेश्राम यांची मागणी
सिंदेवाही : शासनाच्या वतीने घरकुल लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास रेती योजना लागू केली असून त्या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करावी, व इतरही गाव विकासात्मक कामासाठी रेती उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी वासेरा येथील युवा सरपंच दिलीप मेश्राम यांनी केली आहे.
. शासनाच्या वतीने विविध योजने अंतर्गत सिंदेवाही तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरकुल योजना देण्यात आली असून अनेक ग्राम पंचायत अंतर्गत अनेक बांधकाम सुद्धा मंजूर झाले आहेत. मात्र प्रशासनाने रेती योजनेची अंमलबजावणी केली नसल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांसह इतरही बांधकाम रखडलेले आहेत. रेतीमुळे घरकुल लाभार्थी अजूनही आपल्या घरकुलाचे बांधकाम सुरू करू शकले नाही. पावसाळा तोंडावर आला असून रेती अभावी अनेकांचे घरकुल पूर्ण होत नसल्याने लाभार्थ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. जर लवकर पावसाळा सुरू झाला तर, अनेक लाभार्थ्यांना आपल्या हक्काच्या निवासापासून वंचित रहावे लागणार आहे.
. शासनाच्या रेती धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी अनेकदा तालुका प्रशासनाला मागणी केलेली आहे. मात्र अजूनही घरकुल लाभार्थ्याना मोफत रेती उपलब्ध झाली नाही. काही लाभार्थ्यांनी महागडी रेती घेऊन आपले घरकुलाचे बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना जास्तीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच अनेक ग्राम पंचायत अंतर्गत गाव विकासात्मक बांधकाम मंजुरात असून रेती अभावी बांधकाम रखडलेले आहेत. त्यामुळे सिंदेवाही तालुका महसूल प्रशासनाने शासनाच्या रेती धोरणाची तात्काळ अंमलबजावणी करून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून द्यावी. तसेच इतर बांधकामासाठी सुद्धा रेती उपलब्ध करावी. अशी मागणी वासेरा ग्राम पंचायत चे सरपंच दिलीप मेश्राम यांनी माध्यमातून केली आहे.


