Home चंद्रपुर जिल्हा विशेष आनंदवन चौकात वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

आनंदवन चौकात वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

938

कायमस्वरूपी उपाययोजना करा विकास ग्रुपची मागणी

वरोरा : शहरातील सर्वाधिक गजबजलेला आणि महत्त्वाचा चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंदवन चौकातील वाहतूक समस्येने आता गंभीर स्वरूप धारण केले असून, विकास ग्रुप, चिनोरा तर्फे या समस्येवर तात्काळ आणि ठोस उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे. यासाठी २६ एप्रिल रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी नयोनी साठम, यांना निवेदन देण्यात आले.

.      आनंदवन चौक हा वरोरा शहराचा प्रमुख वाहतूक केंद्रबिंदू आहे. या परिसरात ५ ते ७ शाळा, महाविद्यालये, बँका तसेच आठवडी बाजार असल्यामुळे येथे प्रचंड नागरिकांची व विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्यातच चंद्रपूर, नागपूर व चिमूर कडून येणाऱ्या बसगाड्यांचा थांबा येथे असल्याने प्रवाशांची चढउतार याठिकाणीच होते.

.       वाहतूक नियंत्रणाची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने गैरसोयीची परिस्थिती निर्माण होते. शाळा व कॉलेज सुरू किंवा सुटण्याच्या वेळेत ही समस्या अधिकच तीव्र होते. बायपासवरून धावणाऱ्या वेगवान वाहनांची गर्दी, रस्त्याच्या कडेला उभे राहणारे ऑटो आणि परिसरातील अतिक्रमण यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, यामध्ये काही गंभीर अपघातही घडले आहेत.

.       विकास ग्रुप चिनोरा च्या वतीने प्रशासनाकडे आनंदवन चौकात सिग्नल यंत्रणेची स्थापना, वाहतूक पोलिसांची पूर्ण वेळ नेमणूक, बायपास मार्गावरून ऑटो थांबे हटविणे, रस्त्यालगतची अतिक्रमणे काढणे, नागरिकांसाठी सुरक्षित बसथांबा व रस्ता रूंदीकरण या मागण्या मांडल्या आहेत. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांनी समस्या सोडविण्याची दृष्टीने उचित कार्यवाही करण्याबाबत आश्वासित केले आहे. सदर निवेदनाची प्रत खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक वरोरा यांनाही देण्यात आली असून, विकास ग्रुपने हा प्रश्न प्रशासनाच्या प्राधान्य यादीत आणावा, अशी मागणी केली आहे.

.    “नागरिकांचा जीव धोक्यात घालून दररोज या चौकात प्रवास करावा लागतो. प्रशासनाने आता याची गंभीर दखल घेऊन उपाययोजना कराव्या यासाठी विकास ग्रुपचे वतीने पुढाकार घेण्यात आला. त्यावेळी तुळशीराम मिलमिले, बळीराम डोंगरकर, काशिनाथ शेंडे, अरुण चौधरी, हिरामण गोहने, दशरथ दुर्गे, अरुण काळे इत्यादी सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!