विद्यार्थ्यांचे आगार व्यवस्थापकांना साकडे
ब्रह्मपुरी : उन्हाळा दाहकता वाढल्याने शाळा सकाळच्या पाळीत सुरू झाल्या. मात्र विद्यार्थ्यांना सकाळच्या पाळीत शाळेत जाण्यासाठी बस सुविधा नसल्याने परिसरातील विद्यार्थ्यांना सायकलने किंवा पायदळ शाळेत पोहचावे लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाची बस सकाळच्या पाळीत सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी एसटी डेपोत पोहचात आगार व्यवस्थापकांना साकडे घातले.
. दि रुरल एज्युकेशन सोसायटी ब्रह्मपुरी, द्वारा संचालित लोक विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय गांगलवाडी येथे परिसरातील आवळगाव, आक्सापूर, वांद्रा, चिचगाव, कोसंबी, डोरली इथपासूनचे विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना मानव विकास अंतर्गत परिवहन करण्यासाठी बसची सोय असते. परंतु अलीकडे महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार व उन्हाची दाहकता लक्षात घेऊन अनेक शाळा ह्या सकाळ पाळित भरत असल्याने व सकाळी बसची सुविधा नसल्याने सदर गावातील विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत पोहोचण्यासाठी पायपीट तर कधी सायकल स्वारी करावी लागते तेही जीव मुठीत घेऊन. सदर क्षेत्र हे जंगलव्याप्त क्षेत्र असून इथून सकाळी प्रवास करणे हे जीव घेणे ठरू शकते. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांना घेऊन लोक विद्यालय गांगलवाडी येथील पद्माकर रामटेकेर, तुळशीदास मोहुरले, जुम्नाके, दलाल यांनी विद्यालयाचे प्राचार्य सुरेश बुरडे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मपुरी येथील आगार व्यवस्थापक इंगोले यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांची आपबीती सांगितली व निवेदन दिले. त्यानुसार उद्यापासूनच आपली मागणी पूर्ण होईल असे आश्वासन त्यांनी शिष्ट मंडळाला दिले. शिक्षकांच्या कर्तबदारीबद्दल पालकांमध्ये समाधान दिसून येत असल्याचे बोलल्या जात आहे.


