मोरवा येथील घटना
चंद्रपूर : चंद्रपूर – नागपूर मार्गावर मोरवा येथे एका अवैद्य डिझल व ऑईल साठ्याला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी (दि.5) सायंकाळी उशिरा उघडकीस आली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने लगतचे भंगार गोदामही आगीच्या विळख्यात आले होते.
. चंद्रपूर – नागपूर मार्गावरील मोरवा जवळ ईगल नावाचा ढाबा आहे. याच ढाब्याच्या मागे ऑईलचा अवैध गोदाम आहे. या ठिकाणी असलेल्या ऑईल साठ्याला अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. लगतच्या गोदामाजवळ असलेल्या भंगार गोदामाला आगीने विळख्यात घेतले. डीझेल – ऑइलच्या अवैध साठ्याला आग लागल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
. ईगल नावाच्या ढाब्याच्या मागे असलेल्या या गुप्त गोदामाने अवैध धंद्यांचे जाळे उघड केले असून, प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळेच असे धोकादायक साठे बिनधास्त सुरु असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या गोदामात मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या डिझेल आणि ऑइल साठवले जात होते. ही बाब प्रशासनाच्या नजरेपासून दूर होती, की प्रशासनच याकडे दुर्लक्ष करत होते, हा मोठा प्रश्न आहे. इतक्या ज्वलनशील पदार्थांचा साठा रहिवासी परिसरात असणे म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळ नव्हे का? आज आग लागली म्हणून ही गोदामे चर्चेत आली, पण जर हा साठा फुटला असता, तर किती मोठी जीवितहानी झाली असती, याचा विचारच न केलेला बरा.
. पोलीस आणि महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अवैद्य ऑईल साठ्याच्या आग लागल्यानंतर त्या ठिकाणी स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.


