उपविभागीय अधिकारी पथकाची धाड
दहावीचा इंग्रजी विषयाचा होता पेपर
बल्लारपूर : तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील दहावीच्या परिक्षा केंदावर शनिवार ( दि. १ ) रोजी अचानक भरारी पथकाने धाड टाकली. इंग्रजी विषयाचा पेपर होता. यावेळी पेपर सोडविणारे विद्यार्थ्यी सर्रास कापी करताना भरारी पथकाला आढळून आले. या प्रकरणी एका शिक्षकाला भरारी पथकाने दोषी ठरविले. ही कारवाई जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरी येथील उपविभागीय अधिकारी अपूर्वा बासूर यांच्या पथकाने केली.यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ निर्माण झाली असून यानंतर नांदगाव (पोडे) येथील परिक्षा केंद्र बं करण्याचा अहवाल राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
. बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव ( पोडे ) येथील स्व.गोपाळराव वानखेडे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय येथे पूर्वी पासून राज्य शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चे परिक्षा केंद्र दिले आहे. आज दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. अचानक या केंद्रावर भरारी पथकाने धाड टाकली. दरम्यान वर्ग खोली दोन मध्ये उपविभागीय अधिकारी अपूर्वा बासूर यांनी तपासणी केली. त्यावेळी एक शिक्षक परिक्षार्थी विद्यार्थ्यांकडून कापी जमा करत असल्याचे दिसून आले. हाच प्रकार वर्ग खोली क्रमांक सात मध्ये देखील आढळून आला. यामुळे या परिक्षा केंद्रावर केंद्र प्रमुखाच्या संमतीने सर्रास कापी प्रकार असल्याचे भरारी पथकाला आढळून आले. यामध्ये दोन विद्यार्थ्यांवर कारवाई केल्याची माहिती आहे.
. याप्रकरणी बल्लारपूर तालुक्यातील स्व.गोपाळराव वानखेडे माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय हे परिक्षा केंद्र आगामी परीक्षेदरम्यान रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडे पाठविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना कापी करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव ( पोडे ) येथील स्व.गोपाळराव वानखेडे माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील भरारी पथकांच्या कारवाई मुळे शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.


