महसूल मंत्र्यांना तहसिलदार मार्फत साकडे
४६५ च्या आसपास घरकुल लाभार्थ्यांचे स्वप्न अधांतरी
बल्लारपूर : तालुक्यात विसापूर सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. येथील मतदारांची संख्या ८६00 आहे.येथे राज्य व केंद्र शासन पुरस्कृत विविध घरकुल योजनेंतर्गत ४६५ च्या आसपास घरकुल मंजूर आहे. मात्र,वाळू अभावी घरकुल लाभार्थ्यांचे स्वप्न अधांतरी लटकले आहे. यासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बल्लारपूरचे तहसिलदार अभय गायकवाड यांच्या मार्फत साकडे घालून विसापूर येथील घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांनी निवेदन सादर केले आहे.
. बल्लारपूर तालुक्यात शासनस्तरावरून कोणताही रेती घाट उपलब्ध नाही. परिणामी घरकुल लाभार्थ्यांना व गावातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी अवैधरित्या रेती घ्यावी लागत आहे. यावर देखील महसूल प्रशासनाच्या माध्यमातून प्रतिबंध लावण्यात आले आहे. बांधकाम करण्यासाठी वाळू उपलब्ध होत नसल्यामुळे गावातील घरकुल लाभार्थ्यांचे घरकुलांचे स्वप्न अधांतरी लटकले आहे. त्याचप्रमाणे गावातील रस्ते, नाली बांधकाम व तत्सम बांधकाम रखडले आहे. शासनाच्या माध्यमातून लोकाभिमुख योजना राबविण्यात येत आहे. मात्र शासनच बांधकामात अडचण निर्माण करत आहे. हा विरोधाभास नागरिकांच्या जीवावर उठला आहे.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे केंद्र व राज्य शासन पुरस्कृत शबरी घरकुल योजनेत ७६,रमाई आवास योजनेअंतर्गत ४५,यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे ४0, मोदी घरकुल योजनेची १२५ आणि पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत १७८ असे एकूण ४६५ घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. घरकुल लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळावा, हा उद्देश शासनाचा आहे. मात्र रेती अभावी घरकुल लाभार्थ्यांचे स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता बळावली आहे.
. यावर जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाने उपाययोजना करून न्याय देण्याची मागणी विसापूर ग्रामपंचायत सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम व ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गेडाम यांनी बल्लारपूर येथील तहसिलदार अभय गायकवाड यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे. त्याचप्रमाणे रेती अभावी गावातील विकास कामे प्रभावित होत असल्याची जाणीव महसूल प्रशासनाला करून देण्यात आली. तालुका प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
” बल्लारपूर तालुक्यात विसापूर मोठे गाव आहे. आमच्या गावात केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध घरकुल योजनेत जवळपास पाचशे लाभार्थ्यांची निवड करून मंजूर करण्यात आले आहे. मध्यंतरी महसूल प्रशासनाने ९७ ब्रास वाळू साठा जप्त करून निवडक २६ घरकुल लाभार्थ्यांना वितरीत केला. आता मात्र घरकुल लाभार्थ्यी आम्हाला वाळू बांधकाम करण्यासाठी उपलब्ध करून द्या, म्हणून तगादा लावत आहे. रेती अभावी गावातील विकास कामे व घरकुल लाभार्थ्यांना अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण दूर करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर करून बांधकामासाठी रेती उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली आहे. अनेकश्वर मेश्राम, उपसरपंच विसापूर. “


