रेती तस्करीचा तिसरा बळी
सावरगाव येथील घटना
चिमूर : तालुक्यातील सावरगाव गावाजवळ पहाटे 5 वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर पलटून हमाल मजुराचा जागीच मृत्यू झाला तर ट्रॅक्टर चालक गंभीर आहे. सचिन बापूराव मेश्राम (30) रा. सावरगाव असे मृतक मजुराचे नाव आहे.
. ट्रॅक्टरने रेती तस्करी अंतर्गत जीव गमावण्याची ही चिमूर तालुक्यातील तीसरी घटना आहे.या अगोदर खडसंगी परिसरात ट्रॅक्टर वरून पडल्याने तरुणांचा बळी गेला होता.त्यानंतर शिवनपायली येथील युवकांनी सुध्दा जीव गमावला आहे. हे विशेष.
. रात्रीच्या अंधारात रेतीची चोरी करून रेती तस्करी करण्याचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. गुरवार दि 16 जानेवारी च्या पहाटे सावरगाव येथे रेती टाकून, विना नंबरचे ट्रॅक्टर नेरी कडे परत भरधाव जात असताना सावरगाव समोरील छोट्या मोडिवर शेतात ट्रॅक्टर पलटल्याने मजूर गाडीच्या खाली दबल्याने मृत्यू झाला. सदर ट्रॅक्टर नेरी येथील अनिकेत जांभुळे यांच्या मालकीचा असून ट्रॅक्टर विना नंबरचा असल्याची माहिती आहे. मृतकाच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी व दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच ट्रॅक्टर जप्त करण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.
. अवैद्य रेती प्रकरणात मजुरांचा नाहक बळी जात असतांनाही महसूल विभाग रेती तस्करीवर अंकुश लावण्यात असमर्थ ठरत आहे. ही शोकांतिका आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रेतीतस्कर पुन्हा किती बळी घेतील,हे सांगता येत नाही. तरुण युवकाचा बळी गेल्याने परिसरात शोक व्यक्त होत आहे. सदर घटनेने पुन्हा एकदा रेती तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महसूल विभाग आणि पोलीस विभाग आता कोणती भूमिका घेतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.


