हजारो महिला पुरुषांची उपस्थिती
विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन
नागभीड : परभणी येथे झालेल्या संविधानाच्या प्रतिमेचे विटंबना, भिमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिस कोठडीत झालेली हत्या व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेले वायफळ वक्तव्य या घटनांमुळे भिमसैनिक पेटून उठला आहे. परभणी प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व अमित शहा यांनी पदाचा राजीनामा द्यावा ही मागणी घेऊन शुक्रवारी नागभीड तहसील कार्यालयावर संविधान प्रेमी भिमसैनिकांचा भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
. सदर मोर्चाची सुरुवात बाजार चौक नागभीड येथून करण्यात आली. यात हजारोच्या संख्येत आंबेडकरी अनुयायांनी सहभाग नोंदविला. मोर्चामध्ये अमित शहा मुर्दाबाद, सोपान पवार याला फाशी द्या, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, अशा विविध घोषणा आणी फलक हातात घेऊन आंबेडकरी अनुयायी तहसील कार्यालयाकडे पोहचले. मोर्चा तहसील कार्यालयात पोहचताच मोर्चाचे रूपांतर सभे मध्ये झाले.
. यावेळी खासदार नामदेव किरसान, सतीश वारजूकर, अरविंद सांदेकर, शाम रामटेके, प्रा. अनमोल शेंडे, खेमराज मारस्कोल्हे, डॉ. टेम्भूरने, लांडगे, शर्मिला रामटेके यांनी सभेला मार्गदर्शन केले. त्या नंतर तहसीलदार प्रताप वाघमारे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
. आंदोलनातील प्रमुख मागण्या मध्ये परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्या जवळील संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या सोपान पवार या नराधमाला फाशीची शिक्षा द्या. कोणताही अपराध नसताना शहिद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कष्टडीत खून करणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचेवर मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवावा. शहिद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपयाची आर्थिक मदत देऊन त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नौकरी देण्यात यावी. परभणी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या जनतेवर नोंदविलेले गुन्हे मागे घ्यावे. भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाच्या कुबुद्धीने उच्चार करून अपमान केल्यामुळे देशवासियांच्या भावना दुखावल्या. त्यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.
. चंद्रपूर जिल्यातील चिमूर तालुका अंतर्गत येत असलेल्या मौजा गदगांव येथील बुध्दाची प्रतिमा प्रशासनाने बळजबरीने हटविल्याने ती प्रतिमा पुन्हा त्याच ठिकाणी प्रस्थापित करावी. अशा विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.


