हरभरा पीक हातातून जाणार
वरोरा : सध्या वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी थंडीचा कडाका, तर कधी ढगाळ वातावरण तर कधी अवकाळी पाऊस पडत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना फटका बसत आहे. चंद्रपुर जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळं रब्बी हंगामातील हरभरा पीक धोक्यात आलं आहे. हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे हातात आलेल हरभर्याच पीक हातातून जाणार असल्याची भीती शेतकर्यांत असून आता शेतकऱ्यांसमोर मोठ संकट उभं राहिलं आहे.
. चंद्रपुर जिल्ह्यात वरोरा व भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली गेली आहे. सोयाबीन पीक झाल्यानंतर रब्बी हंगामात हरभऱ्याची मोठी पेरणी करण्यात आली होती. मात्र, ढगाळ वातावरणामुळे व अवकाळी पावसामुळे हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. तर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हरभऱ्याची झाडे मरत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. मागील वर्षी हरभऱ्याला चांगला दर मिळाल्यानं यावर्षी रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभरा पिकाला प्राधान्य दिल्याचे चित्र होते. मात्र, नैसर्गिक संकटामुळं शेतकऱ्यांनी लावलेले भांडवलही निघणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
नुकसानीचे कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करुन मदत द्यावी हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं शेतकऱ्यांना उत्पादनात मोठा फटका बसणार आहे. तर काही ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं हरभऱ्याची झाडे मरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करावेत. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. किशोर डुकरे, शेतकरी नेते, वरोरा


