नागभीड : नागभीड तालुक्यात बोथली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात ग्रामवासीयांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी मंचावर प्राध्यापक नन्नावरे, मुख्याध्यापक वाघे, व्यंकटराव पाथोडे, घुटके, विजया पाथोडे, कुंभरे, पुष्पा पाथोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
. कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. तसेच मान्यवरांनी उपस्थित महिला व विद्यार्थ्यांना स्त्री शिक्षणाचे व संविधानाचे महत्व विषद करून महिला सक्षमीकरणाने गावाचा विकास कसा होऊ शकतो हे सांगितले. स्त्री शिक्षणाने केवळ गावाच्याच नव्हे तर देशाच्या प्रगतीमध्ये योगदान लाभले आहे याकरिता प्रत्येक पालकांनी आपल्या मुलींसाठी शिक्षणाच्या वाटा मोकळ्या करून दिल्या पाहिजे. समता, बंधुता व देशप्रेम ही त्रिसूत्री प्रत्येक नागरिकांनी अवलंबणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.
. यावेळी जि. प. शाळेच्या मुलांनी व मुलींनी हातात सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा घेऊन ढोल ताशा सहित गावातून मिरवणूक काढली. या मिरवणुकीत गावातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या गायधने यांनी केले तर संचलन सुनंदा मुलमुले यांनी केले. प्रणिता खोब्रागडे यांनी मान्यवरांचे व उपस्थित महिला भगिनींचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमाला मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता जयश्री पाथोडे, सोनिया दुधे, अल्का पाथोडे, सुषमा भेंडारकर आदीनी प्रयत्न केले.


